विधानसभेत निलंबित आमदारांचे प्रश्नही झाले निलंबित!

0

मुंबई (निलेश झालटे) : अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्पात गोंधळ घातल्यामुळे निलंबित केलेल्या आमदारांचे प्रश्न देखील रद्द करण्यात आले आहेत. तसेच ज्या प्रश्नांमध्ये नावे आहेत अशा प्रश्नांमधून निलंबित आमदारांची नावे देखील वगळण्यात आली आहेत. आजच्या कामकाजात कुणाल पाटील यांचे दोन, अमित झनक, हर्षवर्धन सपकाळ यांचे प्रत्येकी एक प्रश्न वगळण्यात आला तर विजय वडेट्टीवार, अमर काळे, वैभव पिचड यांची नावे प्रश्नोत्तरांमधून वगळण्यात आली.

हे सर्व आमदार काँग्रेस- राष्ट्रवादीचे आहेत. आमदार निलंबित झाल्यानंतर त्यांचे प्रश्न वगळणे हे सामान्य नागरिकांच्या अधिकारांवर गदा असल्याची चर्चा आहे. ह्यामध्ये सगळे आमदार हे विरोधी पक्षातील असल्याने विरोधी पक्षांच्या आमदारांच्या प्रश्नांना न्यायचं मिळणार नाही का? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. सभागृहात विरोधक उपस्थित नसल्याने असेही विरोधी पक्षातील एकाही सदस्यांचा प्रश्नावर बुधवारपासून चर्चा होऊ शकलेली नाही. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि सहकारी विरोधी पक्षातील सदस्यांचे प्रश्न हे त्यांचे वैयक्तिक प्रश्न नसून सामान्य नागरिकांचे प्रश्न आहेत हे लक्षात घेणे आवश्यक आहे.