विधान परिषदेच्या उपसभापतीपदी शिवसेनेच्या डॉ.नीलम गोऱ्हे

0

मुंबई: विधान परिषदेच्या उपसभापतींची नियुक्ती आज सोमवारी २४ रोजी करण्यात आली. शिवसेना नेत्या आमदार डॉ.नीलम दिवाकर गोऱ्हे यांची विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध नियुक्ती करण्यात आली. उपसभापती पती निवड होणाऱ्या डॉ.नीलम गोऱ्हे या विधान परिषदेच्या इतिहासात पहिल्या महिला ठरल्या आहेत. शिवसेना नेते परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी नीलम गोऱ्हे यांच्या निवडीचा प्रस्ताव मांडला. पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी त्यांच्या प्रस्तावाला अनुमोदन दिले. विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी निवडीची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी गोऱ्हे यांना उपसभापती पदावर आसनस्थ केले.

विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी शिवसेना आग्रही होती. अखेर त्यावर शिवसेना नेत्याची निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी, कॉंग्रेससह इतर विरोधी पक्षांकडून आमदार जोगेंद्र कवाडे यांचे नाव सुचविण्यात आले होते. मात्र आमदार शरद रणपिसे यांनी कवाडे यांच्या उमेदवारीचा प्रस्ताव मागे घेतला त्यामुळे नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली.