मुंबई । शनिवारी विधानपरिषदेत राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी अर्थसंकल्प सादर करत असताना, विरोधकांनी गोंधळ घालून वारंवार त्यांच्या भाषणात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला, पण विरोधकांच्या घोषणाबाजीला न जुमानता दीपक केसरकर यांनी तब्बल दोन तास प्रचंड गदारोळात मांडला. शेतकर्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारने पाने पुसली. त्यामुळे सरकारविरोधाचा निषेधाचा आवाज यावेळी विरोधी बाकावर महिला सदस्यांचा अधिक दिसला. ज्यांच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण आणि हुस्नबानो खलिफा यांचा उल्लेख करावा लागेल.
अर्थराज्यमंत्री केसरकर अर्थसंकल्प वाचून दाखवत होते व विरोधक निष्प्रभ ठरत होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांनी त्यांच्या पक्षाच्या आक्रमक आमदार विद्या चव्हाण यांना धुरा सांभाळण्याचे आदेश दिले. तेव्हा उभे आयुष्य गोरगरिबांच्या हक्कासाठी कायम आंदोलकाच्या भूमिकेत राहणार्या विद्या चव्हाण यांनी शेतकर्यांच्या हक्कासाठी ही जबाबदारी शिरसावंद्य मानली आणि त्यांनी सहकारी हुस्नबानो यांना हाताशी घेतले. या दोन्ही महिला आमदार मग राज्यमंत्री केसरकर यांच्यापुढे जाऊन घोषणाबाजी करू लागल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्या चव्हाण तर पदर खोचूनच सरकारविरोधी घोषणाबाजी करताना दिसून आल्या. फडणवीस सरकार होश मे आओ, होश मे आओ… भाजपा तेरी नादानी नहीं चलेगी, भाजपा तेरी गुंडागर्दी नहीं चलेगी… नरेंद्र, देवेंद्र मुर्दाबाद, अशा घोषणा देऊन त्यांनी विरोधी पक्षातले आपण भक्कम नेतृत्व आहोत, हे यानिमित्ताने दाखवून दिले.
घडले स्त्रीशक्तीचे दर्शन!
महिला आमदार असल्याने सत्ताधारी पक्षातील नेतेही त्यांना मागे सारण्याचे धाडस करू शकत नव्हते. मुळातच 78 आमदारांच्या विधानपरिषदेत मोजून 4 महिला आमदार आहेत. त्यापैकी एक स्मिता वाघ ज्या मुळातच सरकारमध्ये आहेत. शिवसेनेच्या नीलम गोर्हे त्या दिवशी काही कारणास्तव उपस्थित राहू शकल्या नाहीत. त्यामुळे आक्रमक महिला नेतृत्वाची जबाबदारी या दोन महिला अमदारांवर आली होती. असे असले तरी एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या महिला आमदारांनी सत्ताधार्यांना बेजार केले, हे विधान परिषदेत खर्या अर्थाने स्त्रीशक्तीदर्शन घडवणारे होते.
शेतकरी अन्नदाता आहे. त्याच्या कर्जमाफीसारखा महत्त्वाचा विषय बाजूला ठेवून सरकार राज्याचा अर्थसंकल्प मांडते, हे निंदनीय आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी आम्ही सभागृहाच्या वेलमध्येच नाही, तर रस्त्यावरही इतकाच आक्रमकपणा दाखवण्यास मागे हटणार नाही.
-विद्या चव्हाण, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस.