विधान परिषदेवर निर्वाचित आमदारांनी घेतली शपथ!

0
शपथविधीच्या कार्यक्रमाला आमदारांचे जोरदार शक्तिप्रदर्शन 
मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेवर महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारा विधान परिषद सदस्य म्हणून निर्वाचित झालेल्या अकरा सदस्यांनी सोमवारी सदस्यत्वाची शपथ घेतली. विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी ही शपथ दिली. यात पशुसंवर्धन दुग्ध विकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर, प्रा. डॉ. मनीषा कायंदे यांच्यासह विजय ऊर्फ भाई गिरकर, जयंत प्रभाकर पाटील, ॲड. अनिल परब, शरद रणपिसे, अब्दुल्लाखान अ.लतिफ खान ऊर्फ बाबाजानी दुर्राणी, निलय नाईक, रमेश पाटील, रामराव पाटील, डॉ. वजाहत मिर्झा यांचा समावेश आहे.
विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात संपन्न झालेल्या या शपथविधी समारंभाला सभापती, माजी उपसभापती, माणिकराव ठाकरे, प्रधान सचिव, डॉ. अनंत कळसे, सचिव उत्तमसिंग चव्हाण, उपसचिव विलास आठवले, ऋतुराज कुरतडकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. विधान परिषद हे राज्याचे वरिष्ठ सभागृह आहे. सध्या माहाराष्ट्र विधान परिषदेवर 78 सदस्य आहेत. विधान परिषदेवरील एक तृतीयांश सभासद दर दोन वर्षांनी निवृत्त होतात. त्यांच्या जागी नवे सभासद निवडले जातात. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 171 (3)(घ) अन्वये या सदस्यांना शपथ देण्यात येते.
दरम्यान या शपथविधीच्या कार्यक्रमाला नवनिर्वाचित आमदारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. आमदार रमेश पाटील यांच्या समर्थनार्थ यावेळी शेकडो कोळी समाजातील कार्यकर्ते ढोल ताशांच्या गजरात विधानभवन परिसरात जल्लोष करताना दिसून आले. तर भाई गिरकर यांचे देखील कार्यकर्ते घोषणाबाजी आणि जल्लोष करत होते. दरम्यान सर्व सदस्यांनी शपथ घेतल्यानंतर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन देखील केले.