विधान परिषदेसाठी आज मतदान

0

मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांतून विधानपरिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी आज 21 मे रोजी मतदान होत आहे. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, लातूर-उस्मानाबाद- बीड, परभणी-हिंगोली, अमरावती, आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या जागांचा समावेश आहे.

बीडमध्ये प्रतिष्ठा पणाला

लातूर-उस्मानाबाद-बीडच्या जागेसाठीची निवडणूक सर्वात चुरशीची मानली जात आहे. कारण ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषेदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी ही निवडणूक आपल्या प्रतिष्ठेची केली आहे. या मतदारसंघात भाजपचे सुरेश धस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांच्यात लढत होत आहे. राष्ट्रवादीने रमेश कराड यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यांनी ऐनवेळी अर्ज मागे घेतल्याने, राष्ट्रवादीची आणि पर्यायाने धनंजय मुंडेंची चांगलीच पंचाईत झाली. त्यामुळे राष्ट्रवादीला ऐनवेळी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अशोक जगदाळे यांना पाठिंबा द्यावा लागला.

राणे यांचा राष्ट्रवादीला पाठिंबा 

नाशिकमध्येही विधानपरिषद निवडणुकीत रंगत वाढली आहे.  शिवसेनेचे नरेंद्र दराडे विरुद्ध राष्ट्रवादीचे शिवाजी सहाणे यांच्यात सामना होत आहे. कोकणात राष्ट्रवादी काँग्रेसने सुनील तटकरे यांचा मुलगा अनिकेत तटकरे यांना, तर शिवसेनेने राजीव साबळे यांना उमेदवारी दिली आहे. नारायण राणे यांनी शिवसेनेला विरोध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. अमरावतीत भाजपचे प्रवीण पोटे आणि काँग्रेसचे अनिल मधोगरिया यांच्यात सरळ लढत होत आहे.