विधान परिषद बनले देशातले पहिले पेपरलेस सभागृह

0

मुंबई – राज्य विधान परिषद सोमवारी देशातले पहिले कागदविरहित (पेपरलेस) सभागृह झाले. आज विधान परिषदेतील सर्व आमदारांना टचस्क्रीन टॅब देण्यात आले असून सभागृहाशी संबंधित सर्व कामकाज आता या टॅबच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया, या उपक्रमाला पुढे नेताना हे पाऊल उचलण्यात आले आहे. जेव्हापासून आपण या सभागृहाच्या सभापतीपदी विराजमान झालो, तेव्हापासून पेपरलेसच्या दिशेने जाण्याचा विचार केला आणि आज त्या विचाराचे प्रत्यक्षात रूपांतर झाल्याचे दिसत आहे. देशातील पहिले पेपरलेस सभागृह होण्याचा मान आपल्या सभागृहाला मिळत असल्याबाबत मला विशेष आनंद होत असल्याचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी सांगितले.

या टॅबमध्ये १९३७ पासून ते २०१६ पर्यंतची विधान परिषदेबाबतची सर्व माहिती देण्यात आली असून रोजचे ठराव, तारांकित व अतारांकित प्रश्नांच्या याद्या, लक्ष्यवेधी सूचना, सदस्यांनी घेतलेल्या सोयीसुविधा, महामंडळाचे अहवाल, विधानमंडळ समित्यांचे अहवाल अशा प्रकारची सर्व प्रकारची माहिती यामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील, काँग्रेसचे भाई जगताप, शिवसेनेच्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या निर्णयाबाबत सभापतींचे अभिनंदन केले.

आता कागदपत्रे फाडून फेकता येणार नसल्याचे दिवाकर रावते यांनी सांगताच फक्त आता माझ्यावर काही फेकून मारू नका, अशी कोपरखळी निंबाळकर यांनी मारली. यामध्ये सर्व कारभार इंग्रजीत आहे. तो मराठीत असायवला हवा, असेही रावते म्हणाले. तेव्हा आता सुरूवात आहे. हळूहळू सर्वच मराठीत होईल, असे सभापतींनी सांगितले.