हडपसर । पुण्यात शतकोत्तर रौप्यमहोत्सव गणेशोत्सव साजरा करीत असताना सर्व नियमांचे पालन करा. गणेश मंडळाच्या कार्याचे कौतुक करून विधायक कामाला प्रेरणा देण्याचे काम पुरस्काराच्या माध्यमातून होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मंडळांनी उत्सवात सहकार्य करावे, असे आवाहन वानवडी सहायक पोलिस आयुक्त समीर शेख यांनी केले.
हडपसर पोलीस स्टेशन व हडपसर पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील साधना जिमन्याशियम हॉलमध्ये गणेशोत्सव 2016 सुखकर्ता पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. आमदार योगेश टिळेकर, वरिष्ठ पत्रकार विलास जाधव, सुभाष भारद्वाज, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू पवार, माजी महापौर वैशाली बनकर, नगरसेवक मारुती तुपे, आनंद अलकुंटे, जयप्रकाश वाघमारे, बाळासाहेब भोसले, महावितरणचे येलपल्ले, अर्चना कामठे, सरपंच सुधा हरपळे यांच्यासह हडपसर परिसरातील गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. कृष्णकांत कोबल यांनी गणेश मंडळांना सूचना दिल्या.
सामाजिक सुरक्षितता जपा
उत्सव साजरे करताना सामाजिक सुरक्षितता जपावी, ध्वनिप्रदूषण होणार नाही याबरोबर धार्मिक सलोखा राखला पाहिजे आणि न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करून सर्व परवानग्या ऑनलाइन व ऑफलाइन घ्याव्यात, असे पवार यांनी सांगितले. पुण्यातील गणेशोत्सव मानाचा असतो. पावित्र्य भंग होणार नाही याची काळजी घेणे ही कार्यकर्ते व पदाधिकार्यांची जबाबदारी आहे, असे जेष्ठ पत्रकार विलास जाधव यांनी सांगितले. फाजील खर्चाला फाटा देऊन सामाजिक उपक्रम राबवावेत, असे आवाहन आमदार योगेश टिळेकर यांनी केले. यावेळी नवरंग मित्र मंडळ, श्री. गणेश फेस्टिवल यांच्यासह विविध मंडळांना पुरस्कार वितरीत करण्यात आले. या कार्यक्रमाचे संयोजन विष्णू पवार, अंजुमन बागवान, विश्वजित खुळे, दीपक वाघमारे, कृष्णकांत कोबल, डॉ. शंतनू जगदाळे यांनी केले.