भुसावळ । जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती जीवन जगतो मात्र प्रत्येकाने सन्मार्गाने जीवन जगले पाहिजे. जीवनाचे दोन अंग आहेत. त्यात जीवनात नकारात्मक व चुकीच्या गोष्टीचा त्याग करणे व दुसरे म्हणजे चांगल्या गोष्टी ज्या विधायक आहेत त्या आत्मसात करुन जीवनात बदल घडवावा असे प्रतिपादन अमरावती येथील धम्मचारिणी अभयान्विता यांनी केले.
प्रलोभनास बळी पडू नका
भुसावळ हायस्कूलमध्ये रविवार 10 रोजी त्रिरत्न बौद्ध महासभा (युथ विंग) तर्फे आयोजित केलेल्या ’जीवनाची पुनर्रचना’ या कार्यशाळेप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी त्रिरत्न बौद्ध महासंघाचे धम्ममित्र व धम्ममैत्रीणी उपस्थित होते. पुढे बोलतांना अभयान्विता म्हणाल्या की, तारुण्यात अनेक युवक प्रलोभनाला बळी पडतात. प्रलोभनामुळे अनेक युवक युवतीचे आयुष्य उध्वस्त होण्याच्या मार्गावर असते. मात्र आलेल्या नैराश्याला व वााईट गोष्टीला सामोरे जाऊन जीवनात कसे यशस्वी झाले पाहिजे. यावर सखोल मार्गदर्शन केले.
समाजहितासाठी पुढाकार घ्या
प्रत्येकाने अपयशावर मात करुन जीवनाची पुनर्रचना केली पाहिजे. नशिबाला दोष न देता किंवा परिस्थीतीला दोषी न धरता स्वत:ला सन्मार्गावर आरुढ करुन आपल्या जीवनाची पुनर्रचना करावी या उदात्त हेतूने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. असे त्यांनी सांगितले. सामाजिक बांधिलकी जोपासून प्रत्येकाने समाजाहितासाठी पुढाकार घेतला पाहिजे. जीवन जगत असताना जात, धर्म, प्रांतवाद करता कामा नये. आपण फक्त माणुसकी जोपासून जीवन जगले पाहिजे असेही धम्मचारिणी अभयान्विता यांनी सांगितले.
कार्यशाळेत 169 विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग
दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांवर धम्मसंस्कार या कार्यक्रमात त्यांनी संस्काराचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात 169 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यशस्वीतेसाठी त्रिरत्न बौद्ध महासंघाचे मनिष गुरचळ, दिपक सपकाळे, उमेश तायडे, दिक्षा गाढे, बुद्धभुषण सपकाळे, प्रविण रामटेके, धम्मचारी आध्यरत्न, धम्ममित्र विनोद शेजवळ, पदमकुमार अहिरे, अश्विन तायडे, सुषमा वारभुवन, मालती धनविज, शिला शाक्यमुनी, नलीनी वारभुवन, आशा अहिरे, नारायण महिरे आदींनी परिश्रम घेतले. र्काक्रमाचे सूत्रसंचालन दिक्षा गाढे यांनी तर आभार अरुंधती गाढे यांनी मानले. परिचय उमेश तायडे, धम्मागिनी सपकाळे यांनी केला.