विधिमंडळातील शिवरायांच्या पुतळ्याची उंची वाढवा

0

शिवसेनेची विधानसभा अध्यक्ष, परिषदेच्या सभापतींकडे मागणी

मुंबई :- मुंबईतील अरबी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उंचीवरून गोंधळ सुरू असताना विधानभवन परिसरातील महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढविण्याचीही आता मागणी केली जात आहे. विधिमंडळाच्या प्रांगणात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पतुळ्याचा आकार व उंची परिसरातील अन्य पुतळ्यांपेक्षा कमी आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांचा संसदेतही भव्य पुतळा आहे. त्याच धर्तीवर विधिमंडळातही छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी केली आहे.

विधिमंडळाच्या आवारात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आदींचे पुतळे असून या पुतळ्यांपेक्षा छत्रपती शिवरायांचा पुतळ्याची उंची बरीच कमी आहे. ती वाढविण्यात यावी अशी मागणी गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी सभागृहाचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे तसेच सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्याकडे केली आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य अनन्यसाधारण आहे. देशाला भूषणावह असे त्यांचे व्यक्तिमत्त्व असून अशा पूजनीय आराध्य दैवताचे संसदेच्या प्रांगणातही भव्य शिल्प आहे. त्याच धर्तीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा उंच पुतळा निर्माण करून राज्याच्या विधिमंडळातही सध्या असलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या जागी त्याची पुनर्स्थापना करावी अशी मागणी रवींद्र वायकर यांनी विधानसभा अध्यक्ष व विधान परिषद सभापती यांना निवेदनाद्वारे केली आहे.