विधिमंडळात गोंधळ

0

नागपूर : विधानपरिषदेत अपेक्षेप्रमाणे बुधवारी दिवसभर मराठा आरक्षणाच्या चर्चेवरून गोंधळ उडाला. 289 अंतर्गत या महत्त्वाच्या विषयावर चर्चा केली जावी या मागणीवरून विरोधकांनी वारंवार गोंधळ केल्याने दुपारपर्यंत सभागृह तब्बल 5 वेळा तहकूब करावे लागले. सुरुवातीला विनायक मेटे यांच्या बोलण्यावरून उडालेला गोंधळ काही काळ रोखण्यात यशस्वी ठरलेल्या विधानपरिषद सभापतींना दुपारच्या सत्रात मात्र मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सभागृह स्थगित करण्याशिवाय पर्याय उरला नाही.

सकाळी 11 वाजेच्या सुमारास काही लक्षवेधी प्रश्नांवर चांगली चर्चा घडून आली. यानंतर केवळ मराठा आरक्षणावर चर्चा करण्याची मागणी करत सभापतींच्या समोर जात विरोधकांनी अक्षरश: हल्लाबोल केला. या गोंधळातच अहवाल ठेवले गेले. यावेळी विरोधी पक्षातील सदस्यांनी कागद फाडून सभापतींच्या दिशेने फेकण्याचा प्रयत्न केला. चर्चेसाठी विरोधकांनी गोंधळ सुरूच ठेवल्याने सभापतींनी 2.48 वाजता दिवसभरासाठी कामकाज स्थगित करण्याचा निर्णय घेतला. विधानसभेतही विरोधकांना मराठा आरक्षणप्रश्‍नी गदारोळ घातला. तसेच, मंत्री महादेव जानकर यांच्या राजीनाम्याची मागणी रेटून धरली.

विधानसभेतही गदारोळ
मोर्चानंतर विरोधी पक्षातील मराठा आमदारांनी विधानभवनासमोर राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली. नागपुरातील मराठा आरक्षण मोर्चा, मंत्री महादेव जानकर यांचा राजीनामा आणि बुलडाणा जिल्ह्यातील दंगलीवरुन विधानसभेचे कामकाज आज तीनवेळा तहकूब करण्यात आले. दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करत सर्वपक्षीय मराठा आमदार आरक्षणासाठी आक्रमक झाले होते. मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी सभागृहात शिवसेनेच्यावतीने करण्यात आली.