मुंबई : अजित पवार यांनी ऐन वेळी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याने, अवघ्या ८० तासात भाजपाचे सरकार कोसळले आहे. राज्यातील लढाईत भाजपाची पीछेहाट झाल्यानंतर पक्षात अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे. शरद पवारांनी भाजपवर डाव उलटवला अशी चर्चा असतानाच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी या घडामोडींवर मौन सोडलं आहे. ‘अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ पक्षनेते असल्यानं भाजपनं त्यांच्यावर विश्वास ठेवला होता,’ असं शहा यांनी सांगितले आहे. तसेच अजित पवारांवर आरोप असलेल्या कुठल्याही प्रकरणाची फाइल बंद करण्यात आलेली नसल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
निवडणूक निकालानंतर राज्यात तब्बल महिनाभर रंगलेल्या राजकीय नाट्याचा काल शेवट झाला. भाजपशी हातमिळवणी करून उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या अजित पवार यांनी माघार घेऊन राजीनामा दिल्यामुळं भाजपचं सरकार अवघ्या ८० तासांत कोसळलं. त्यानंतर आता राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होत आहे. नव्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे उद्या शपथ घेणार आहेत.
भाजपला पाठिंबा देताना राज्यपालांनी स्वत: त्यांच्याशी चर्चा केली होती. राष्ट्रवादीनं सुरुवातीला जेव्हा सरकार बनविण्यास असमर्थता व्यक्त केली होती. तेव्हा राज्यपालांना दिलेल्या पत्रावर अजित पवार यांचीच सही होती. आमच्या समर्थनासाठी त्यांनी दिलेल्या पाठिंबा पत्रावर देखील त्यांची सही होती. त्यामुळं आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला,’ असं ते म्हणाले. अजित पवारांवर आरोप असलेल्या कुठल्याही प्रकरणाची फाइल बंद करण्यात आलेली नाही, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.