विधीमंडळाची दोन्ही सभागृहे शुक्रवारपासून बुधवारपर्यंत तहकुब

0

मुंबई : शेतकर्‍यांच्या कर्जमाफीवरून विरोधकांचे रणकंदन, आमदार प्रशांत परिचारक यांनी सैनिकाविषयी काढलेले बेताल वक्तव्य… या दोन मुद्दयांवरून पाच दिवसांपासून विधीमंडळ अधिवेशनाचे कामकाज होऊ शकलेले नसतानाच, शनिवार-रविवारला लागून आलेला शिमगा यामुळे मंत्री आणि आमदार आपल्या गावी रवाणा झाले आहेत. वीकेंडमुळे महाराष्ट्राचे प्रश्न सुट्टीवर गेले आहेत. सेामवार 6 मार्चपासून विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली. राज्यपालांचे अभिभाषण झाल्यानंतर एकही दिवस अधिवेशनाचे कामकाज सुरळीत होऊ शकलेले नाही.

सलग चार दिवस मंत्री आणि आमदार सुट्टीवर गेले आहेत

आमदार परिचारक यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून विधान परिषदेत विरोधकांनी गोंधळ घातला. परिचारकांवर दीड वर्षाची निलंबनाची कारवाई आणि चौकशी करण्यासाठी उच्चाधिकार समितीची स्थापना झाल्यानंतरच विरोधक शांत झाले. पण त्यानंतर शेतक-यांच्या कर्जमाफीच्या मागणीने दोन्ही सभागृहात विरोधकांनी रणकंदन केलं. विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे शुक्रवारी दोन्ही सभागृह तहकूब करण्यात आली. शनिवार- रविवार सुट्टी त्यातच रविवारी आलेला होळीचा सण आणि सोमवारी धुलीवंदन यामुळे सलग तीन दिवस सुट्टी आली आहे. मंगळवारी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका असल्याने ती सुट्टीही मंजूर करून घेण्यात आली. त्यामुळे शनिवारपासून ते मंगळवारपर्यंत सलग चार दिवस मंत्री आणि आमदार सुट्टीवर गेले आहेत. शुक्रवारी दुपारनंतर दोन्ही सभागृह तहकुब झाल्यानंतर संध्याकाळीच मंत्री आणि आमदार यांनी आपआपल्या बॅगा भरून गावाकडे प्रस्थान केले. शेतक-यांच्या आत्महत्या आणि कर्जमाफी हा राज्यातील सगळयात मोठा प्रश्न असताना त्यावर सरकराकडून अजून कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र शेतकरी राज्याला वा-यावर सोडून मंत्री आणि आमदार शिमग्याला पोहचले आहेत.

पंचायत समिती, जि.प. निवडणुकीची सुट्टी

शनिवार रविवार आणि सोमवार अशी सलग तीन दिवस होळी आणि धुलीवंदनची सुट्टी लागून आली असतानाच मंगळवारी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका असल्याने ती सुट्टीही मंजूर करून घेण्यात आली. शेतक-यांना कर्जमाफी आणि राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनापेक्षाही आमदारांना पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका महत्वाच्या असल्याचेच यातून अधोरेखीत झाले.