नागपूर (प्रतिनिधी) – तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर देशभरातून शोक व्यक्त केला जात असून महाराष्ट्र राज्य विधीमंडळानेही जयललिता यांना श्रद्धांजली वाहिली. दोन्ही सभागृहांनी शोक प्रस्ताव एकमताने संमत केला व कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.हिवाळी अधिवेशानाच्या दुसर्या दिवसाच्या सुरुवातीलाच तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनाबद्दल दुख व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तर विधान परिषदेमध्ये महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शोक प्रस्ताव मांडला. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये जयललिता यांना आदरांजली वाहून दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.
शोक प्रस्तावद्वारे दुख व्यक्त करताना मुख्यमंत्री म्हणाले, जयललितांना लोक प्रेमाने अम्मा म्हणत असत, त्याचे कारण त्यांच्या कामात होते. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जे काम केले त्यामुळे तामिळनाडूच्या इतिहासात सलग दुसर्यांदा निवडून येत मुख्यमंत्री बनण्याचा इतिहास अम्मांनी रचला. जयललिता यांनी राजकीय पंडितांनाही चुकीचे ठरवत दुसर्यांदा निवडणूक जिंकल्याचे सांगत मुख्यंमत्र्यांनी जयललितांचे सामान्य जनतेच्या प्रती असलेल्या निष्ठेची अनेक उदाहरणे सभागृहापुठे ठेवली. अनेक वादांमध्ये राहूनही जयललितांची प्रतिभा व निर्णयक्षमता कायम राहिली. जयललिता या एक बहुप्रतिभासंपन्न व खर्या अर्थाने ‘जनतेच्या नेत्या’ होत्या. त्यांच्या निधनाने तामिळनाडूच्या जनतेवर मोठा आघात झाला असून देशाची अपरिमित हानी झाली आहे. तामिळनाडूच्या या दुःखात महाराष्ट्र सहभागी आहे, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी सभागृहाच्या वतीने शोक व्यक्त करत जयललिता यांना आदरांजली वाहिली. काँग्रेसच्या वतीने पतंगराव कदम यांनी शोक प्रस्तावाला पाठिंबा दिला. यावेळी पंतगराव कदम म्हणाले, जयललितांचे लोकाभिमुख काम पाहण्यासाठी तामिळनाडूमध्ये आघाडीच्या काळात अभ्यास करण्यासाठी पथक पाठवण्याची सूचना आपण केली होती. जयललितांच्या निधनाने काँग्रेस पक्षाच्या वतीने दुख व्यक्त करुन कदम यांनी जयललितांना आदरांजली वाहिली. राष्ट्रवादीच्या वतीने शोक प्रस्तावाला पाठिंबा देताना अजित पवार म्हणाले, देशात राजकीय नेत्यांना भक्त असण्याचे भाग्य फारच कमी लोकांना मिळाले. त्यापैकी जयललिता असल्याचे स्पष्ट केले. शेतकरी कामगार पक्षाचे नेते गणपत देशमुख यांनी शोकप्रस्तावाच्या भाषणात दुःख व्यक्त केले.शिवसेनेच्या वतीने या शोक प्रस्तावावर सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी भावना व्यक्त केल्या.