विधीमंडळाच्या परिसरात रंगला आमदारांचा फुटबॉलचा सामना

0

मुंबई | जागतिक फुटबॉल महासंघाची (फिफा) १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धा ऑक्टोबर महिन्यात भारतामध्ये होत आहे. केवळ भारतामध्येच नव्हे, तर संपूर्ण भारतीय उपखंडामध्ये होणारी ही पहिलीची फिफाची विश्वचषक स्पर्धा आहे.

या ऐतिहासिक स्पर्धेच्या निमित्ताने संपूर्ण देशात क्रीडा-क्रांती रुजविण्याचे आवाहन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. याच निमित्ताने आज महाराष्ट्र विधानभवनाच्या आवारात अध्यक्ष इलेव्हन विरुध्द सभापती इलेव्हन असा आमदारांचा फुटबॉल सामना रंगला. नेहमी विधीमंडळात महाराष्ट्राच्या कोट्यवधी जनतेचे प्रतिनिधीत्व करीत त्यांचे प्रश्न व समस्या मांडणारे आमदार आज फुटबॉल खेळण्यात दंग होते. अध्यक्ष इलेव्हन विरुध्द सभापती इलेव्हन हा असा मैत्रीपूर्ण सामना चांगलाच रंगला. क्रिडा मंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या सामन्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांनी समालोचन केले.

१७ वर्षाखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धा भारतात होणार असून त्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिशन १ मिलियन ची घोषणा केली आहे. त्यासाठी राष्ट्रीय स्तरावर मिशन ११ मिलियन हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात मिशन १ मिलियन हा फुटबॉल क्रांती प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्याला प्रतिसाद देत महाराष्ट्रात क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी मिशन 1 मिलियन- अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय अभियानाची योजना केली आहे. याच संकल्पनेतून आज विधीमंडळाच्या परिसरातील वाहनतळाच्या मोकळ्या जागेत अध्यक्ष इलेव्हन विरुध्द सभापती इलेव्हन असा सामना आयोजित केला होता. सर्वपक्षीय आमदार या फुटबॉल सामनामध्ये सहभागी झाले होते. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस,विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, उपसभापती माणिकराव ठाकरे, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, यांच्या प्रमुख उपस्थितीत दोन्ही संघाच्या कर्णधारांच्या समोर सामन्याचा टॉस उडविण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किक मारुन फुटबॉल सामन्याचा शुभारंभ केला. मुख्यंमत्री फडणवीस यांनी या सामन्याचे समालोचन केले.

या सामना पाहण्यासाठी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, उपसभापती माणिकराव ठाकरे, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, मंत्री चंद्रकांत पाटील, गिरिष बापट, अजित पवार, सुनिल तटकरे,पतंगराव कदम, पंकजा मुंडे,गिराष महाजन यांच्यसह सर्वपक्षीय आमदार उपस्थित होते.

आरोग्य व आनंदासाठीफुटबॉल असे अभियान संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे. या दरम्यान महाराष्ट्रात सर्व शाळांमध्ये फुटबॉल सामने, आमदार चषक फुटबॉल व विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण व कार्यशाळा इत्यादींचे आयोजन केले जाणार आहे. या अभियानाची प्रचार प्रसिध्दी करण्यासाठी विधीमंडळ परिसरात आमदार महोदयांचा सामना आयोजित करण्यात आला होता.

श्री. तावडे यावेळी म्हणाले की, अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय होण्याबरोरबच यानिमित्ताने महाराष्ट्र मिशन १ मिलियन साध्य करताना ३० हजारांहून अधिक शाळांमध्ये सुमारे १ लाख फुटबॉलचे वाटप करण्यात आले आहेत. तर शाळा, महाविदयालये आणि विविध विदयापीठे यामध्ये फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत.याचबरोबर जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिरे, कार्यशाळा आणि क्रीडा क्षेत्रातील करीअर याबाबतही जनजागृती शिबिरे आयोजित करण्यात येणार आहे. अखिल भारतीय फुटबॉल संघटनेच्या धर्तीवर जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय फुटबॉल प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. मुळातच फुटबॉल हा खेळ अत्यंत कमी पैशात खेळला जाणार आणि आरोग्य आणि शारीरीक तंदुरुस्ती ठेवणारा खेळ आहे. शाळांना संबंधित यंत्रणेकडून फुटबॉल आणि इतर साहित्य प्राप्त करुन घेतल्यानंतर ३० हजार शाळांमध्ये फुटबॉल खेळला जाणार आहे.

फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने संपूर्ण देशात क्रीडा संस्कृती रुजविण्याचे प्रयत्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले आहे. यासाठी राष्ट्रीय स्तरावर मिशन ११ मिलियन हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात मिशन १ मिलियन हा फुटबॉल प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या मिशनच्या निमित्ताने शाळांमधून जवळपास १० लाखांहून अधिक मुला मुलींपर्यत फुटबॉल आणि क्रीडा संस्कृती पोहोचविण्यात येणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य ठरत असल्याचे श्री. तावडे यांनी यावेळी सांगितले.

अध्यक्षीय इलेव्हन आणि सभापती इलेव्हनच्या संघात आशिष शेलार,राज पुरोहित, नरेंद्र पवार,जयकुमार गोरे, संग्राम धोपटे, संतोष दानवे, इम्तियाज जलील, संभाजी पाटील निलंगेकर, नरेंद्र पाटील, निरंजन डावखरे,योगेश टिळेकर, उन्मेष पाटील, प्रशांत ठाकूर, परिणय फुके,राहुल कुल, सागर मेघे,महेश लांडगे.जयकुमार रावल, जयंत जाधव,सुनिल शिंदे,राजू तोडसाम, अतुल सावे, अमित घोडे, संजय धोटे आदी आमदार सहभागी झाले होते.