पुणे । पुणे महापालिकेतील विधी-सल्लागार विभागातील अधिकारी आणि कर्मचारी संगनमताने गैरव्यवहार करीत असल्याबद्दलच्या वांरवार येणार्या तक्रारींबाबतच्या प्रकरणाची तातडीने चौकशी करावी, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लिखित उत्तरात दिले.
वडगावशेरी मतदार संघाचे आमदार जगदीश मुळीक यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. पुणे महापालिकेतील विधी व सल्लागार विभागातील गैरव्यवहार गेल्या अनेक वषार्पासून होत असल्याबाबतच्या तक्रारी लेखी निवेदनाद्वारे व तोंडी स्वरुपात प्राप्त झाल्या होत्या. यावर महापालिका आयुक्त यांच्यासमवेत वारंवार झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली होती. परंतु संबधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कार्यवाही होत नसल्याचे दिसून आले. यावर मुख्यमंत्र्यानी सकारात्मक उत्तर दिले. पुणे महापालिकेतील विधी सल्लागार विभाग अनेक वर्षांपासून काही अधिकारी व कर्मचारी हे काही उद्योजकांना हाताशी धरून त्यांना फायदा पोहचेल असे वागताना दिसून येत आहेत. गेली अनेक वर्षे ते त्याच पदावर कार्यरत असून त्या पदाचा गैरवापर होत असल्यामुळे महापालिकेचे आणि शासनाचे नुकसान होत आहे. सर्व सामान्य नागरिकांची व गोर गरिबांची कामे होत नाही आर्थिक पिळवणूक होत आहे आणि हेतू परस्पर कामे टाळली जात आहे. नागरिकांना पैसे मागितले जात आहे अशा अनेक तक्रारी निवेदनाद्वारे प्राप्त झाल्यामुळे आ. मुळीक यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.