विध्वंसक शक्ती वरचढ होत आहेत

0

नवी दिल्ली । सध्या देशात अंधकारमय वातावरण आहे. कायद्याच्या राज्यात काही विध्वंसक शक्ती वरचढ होताना दिसत आहेत, असा आरोप करत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बुधवारी भाजप व संघावर जोरदार हल्लाबोल केला. आपण शहिदांना आज मानवंदना देत आहोत. पण त्याही काळात या आंदोलनाला विरोध करणारे लोक आणि संघटना होत्या. छोडो भारत आंदोलनाला विरोध करणार्‍यांचं देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात काडीचंही योगदान नव्हतं. हे विसरता कामा नये, असे त्या म्हणाल्या.

विशेष अधिवेशनात टीका
’छोडो भारत’ आंदोलनाला बुधवारी 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर संसदेचं विशेष अधिवेशन बोलविण्यात आलं होतं. त्यानिमित्त संसदेत भाषण करताना सोनिया गांधी यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला. त्या म्हणाल्या की, “देशाच्या स्वातंत्र्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते तुरुंगात गेले, त्यांना आजारपणामुळे तुरुंगातच मृत्यूला कवटाळावे लागले. पंडित जवाहरलाल नेहरू यांनाही प्रदीर्घ काळ तुरुंगात रहावे लागले. संकुचित मानसिकता, फुटीरतावादी विचारसरणी आणि धर्मांध विचारांचे गुलाम न होण्याची शिकवण छोडो भारत आंदोलनातून आपल्याला मिळते. ती प्रेरणा आपण घ्यायला हवी, असे सोनिया म्हणाल्या. द्वेषाच्या राजकारणाचे ढग सर्वत्र पसरले असल्याची टीकाही त्यांनी केली. आज धर्मनिरपेक्षता आणि अभिव्यक्ती धोक्यात आली आहे. यालाच विभाजनाचं राजकारण म्हणतात. जर आपल्याला आपलं स्वातंत्र टिकवायचं असेल तर अशा विरोधी शक्तींचा सामना करायला हवा, असंही सोनीया गांधी म्हणाल्या त्यांच्या भाषणाच्या प्रसंगी भाजप सदस्यांनी संसदेत गोंधळ घालत त्यांच्या भाषणात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला.

‘तृणमूल’चीही टीका
तृणमूल काँग्रेसचे नेते सुखेंद्रू शेखर यांनीही राज्यसभेत भाजपवर टीकास्त्र सोडले ‘छोडो भारत’ आंदोलनाच्या काळात काही विश्वासघातकी लोक होते तसेच काही मीर जाफरही होते. त्यांनी कधीच स्वातंत्र्य चळवळीत योगदान दिले नाही. उलट इंग्रजांच्या इशार्‍यावर छोडो भारत आंदोलनाचा बट्याबोळ करण्याचा प्रयत्नच केला. त्यामुळे आपल्या देशातील बंधूभाव संकटात सापडला, अशी टीका शेखर यांनी केली. शेखर यांनी यावेळी ’भाजप, भारत छोडो’चा नारा दिला.