विनयभंगप्रकरणी एकाला एक वर्ष कारावासाची शिक्षा

0

जळगाव। जामनेर तालुक्यातील हिवरखेडा येथील प्रौढाने 30 सप्टेंबर 2012 रोजी 11 वर्षीय चिमुकलीला घरात बोलवून तिचा विनयभंग केला होता. या प्रकरणी जामनेर पोलिस ठाण्यात विनयभंग आणि अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी अतिरीक्त सत्र न्यायाधीश चित्रा हंकारे यांच्या न्यायालयात खटला सुरू होता. त्यात गुरूवारी विनयभंग करणार्‍या प्रौढाला 1 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

सरकारपक्षातर्फे सात साक्षीदार आले तपासण्यात
हिवरखेडा येथील ईश्वर बाबूराव मराठे (वय 55) याने 30 सप्टेंबर 2012 रोजी 11 वर्षीय चिमुकलीला घरात बोलावून तिचा विनयभंग केला. त्यानंतर धमकी दिली होती. या प्रकरणी जामनेर पोलिस ठाण्यात विनयभंग, अनुसूचित जाती, जमाती प्रतिबंधक कायदा3 (1)11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी सरकारतर्फे अ‍ॅड. मोहन देशपांडे, अ‍ॅड. आर. टी. सोनवणे, अ‍ॅड. प्रदीप महाजन यांनी 7 साक्षीदार तपासले. तर आरोपीतर्फे एस. पी. सरताळे यांनी कामकाज पाहिले. चिमुकलीचा विनयभंग केल्या प्रकरणी न्यायाधीश हंकारे यांनी आरोपी ईश्वर मराठे याला शिक्षा सुनावली आहे. त्यात कलम 354 प्रमाणे 1 वर्ष कारावास, 2 हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास 1 महिना कैद तर कलम 342 अन्वये 6 महिने कारावास 1 हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास 15 दिवस कैद; कलम 506 अन्वये 1 हजार रुपये दंड आणि दंड भरल्यास 15 दिवस कैदेची शिक्षा सुनावली आहे.

या प्रकरणातील आरोपी ईश्वर मराठे याची वर्तणूक चांगली आहे. त्यामुळे त्याला कमीत कमी शिक्षा देऊन त्याची पीएल बॉण्डवर मुक्तता करण्याची मागणी आरोपीचे वकील अ‍ॅड. सरताळे यांनी केली होती. मात्र ती मागणी न्यायाधीश हंकारे यांनी अमान्य केली. यानंतर त्यांची कारागृहात न्यायालयाने रवागनी करण्याचे आदेश दिले.