पिंपरी-चिंचवड : सार्वजनिक ठिकाणी महाविद्यालयीन तरुणीचा हात पकडून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी एका 33 वर्षीय तरुणाला पिंपरी न्यायालयाने गुरुवारी एका वर्षाची साधी कैद, अशी शिक्षा सुनावली. पिंपरी न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. पी. फडणीस यांनी हा आदेश दिला. तीन वर्षांपूर्वी आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ हा प्रकार घडला होता. गौरव गिरीश आननपारा (वय 33, रा. तळेगाव-चाकण रस्ता) असे आरोपीचे नाव आहे. देहूरोड येथे राहणार्या पीडित तरुणीने याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
सार्वजनिक ठिकाणी घडला प्रकार
पीडित तरुणी रेल्वेने आकुर्डीला कामानिमित्त येत होती. त्या रेल्वेत असणार्या आननपारा याने तिचा पाठलाग करून छेडछाड केली. काही दिवस तरुणीने दुर्लक्ष केले. मात्र, त्यानंतर आननपारा याने तरुणीचा एक दिवस हात पकडून विनयभंग केला. तरुणीने हा प्रकार पोलिसांना कळवल्यानंतर विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल करून आननपाराला अटक झाली होती. या प्रकरणी न्यायालयाने हा प्रकार सार्वजनिक ठिकाणी घडला असल्याने आरोपीला दोषी ठरवून एका वर्षाची साधी कैद आणि एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास पुन्हा सहा महिने कैद, अशी शिक्षा सुनावली. सहाय्यक अभियोक्ता भूषण पाटील आणि शैलेंद्र बागडे यांनी साक्षीदार तपासले. सहाय्यक निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एस. बी. शेरे आणि के. एस. शेळके, आर. व्ही. मते यांनी तपास केला होता.