चाळीसगाव/सावदा । अल्पवयीन मुलगी आणि विवाहितेने विनयभंग झाल्यामुळे होणार्या मानहानीनंतर आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना सावदा ता. रावेर आणि पिचर्डे ता. भडगाव येथे घडल्या आहेत. यातील बहाळ येथील माहेरवाशीण महिलेने आधी म्हणजे 12 जानेवारी रोजी आत्महत्या केली असून मंगळवारी या प्रकरणी विनयभंग करणार्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर सावदा येथील मुलीवर अत्याचार करणारा कारागृहात आहे. खान्देशकन्या निशा पाटील हिच्या शौर्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळत असतांनाच जिल्ह्यातील महिलांवर अत्याचारांमध्ये वाढ होत असल्याचे यातून दिसून आले आहे.
सावदा येथील पिडीत मुलीने मृत्यूला कवटाळले
येथील 11 जानेवारी रोजी अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याबाबत रघुनाथ इंगळे या आरोपी विरोधात पिडीतेच्या काकूने फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल झाला होता. सदर अल्पवयीन मुलीने दि.14 रोजी मकरसक्रांतच्या दिवशी पुन्हा पोलीस स्टेशनला येवून आरोपीने या आधी ही पिडीत तरुणीशी अत्याचार केल्याचे सांगितल्याने पुरवणी जबाबात यांची नोंद घेवून भा.दं.वि.कलम 376 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. मात्र, काल दि.17 रोजी पिडीत तरुणीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली. सावदा शहरात सर्वत्र खळबळ माजून आरोपीवर तात्काळ कडक कारवाई करण्यासाठी शहरातील रणरागीनी महिलांसह युवक व नागरिकांनी पोलीस स्टेशनवर धाव घेवून ठिय्या आंदोलन केले.
याबाबत असे की, शहरातील काझीपुरा भागात राहणार्या अल्पवयीन मुलीवर रघुनाथ इंगळे रा.सावदा याने अत्याचार केल्याने पिडीतेच्या काकूने सावदा पोलीसात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पिडीत तरुणीने 14 जानेवारी रोजी पुरवणी जबाबात सदर आरोपीने या आधीही दोन वेळेस अत्याचार केल्याचे सांगितल्याने भा.दं.वि.कलम 376 तसेच कायदा 11 3(अ) 4 चा 5(के.एन.) हे वाढीव कलम लागल्या आहे. त्यामुळे आरोपीला रिमांडमध्ये घेत पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. मात्र, काल दि.17 जानेवारी रोजी पिडीत अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याने बलात्कारांसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा भा.दं.वि.कलम 306 प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. सदर पिडीत तरुणीचे शवविच्छेदन रावेरला वैद्यकीय अधिकारी बारेला यांनी शवविच्छेदन केले. त्या आधी सदर पिडीतेची वैद्यकीय चाचणी ही करण्यात आली होती. पिडीतेवर 17 रोजी हतनूर धरणावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
शहरात सर्वत्र संतापाचे वातावरण
अल्पवयीन पिडीत मुलीवर गावातील नराधमाने अत्याचार करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याने शहरात सर्वत्र संतापाचे वातावरण होते. काजीपुरा भागासह सर्वत्र शहरातील स्त्रीयांनी सावदा पोलीस स्टेशन गाठून धडक मोर्चाद्वारे आरोपीवर तात्काल कारवाई व्हावी, यासाठी ठिय्या आंदोलन केले. आंदोलन करणार्या महिलांमध्ये नगराध्यक्ष अनिता येवले, उपनगराध्यक्ष नंदा लोखंडे, माजी नगरसेविका निलीमा बेंडाळे,नेहा गाजरे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी यांच्यासह शहरातील रणरागीनींनी सावदा पो.स्टेचे स.पो.नि.जयवंत सातव यांना महिलांनी कडक करावाई व्हावी, यासाठी मागणी केली. यावेळी सपोनि सातव यांनी उपस्थित स्त्री-पुरुषांना आरोपीवर कडक कारवाई करण्यात होईल, असे आश्वासन दिले. मात्र, पिडीत अत्याचार ग्रस्त झाल्याने तिने आत्महत्या केली. या प्रकाराने सर्व सावदा शहरात हळहळ व्यक्त होत असून आरोपीला फाशीची शिक्षा होणेची मागणी करीत आहे. पुढील तपास सपोनि सातव यांच्यासोबत सपोनि श्री. महाले, खडसे व शहर पोलीस हे करीत आहे.
पिचर्डे येथील एकावर गुन्हा
दुसरीकडे चाळीसगाव तालुक्यातील बहाळ येथील माहेरवाशिण व भडगाव तालुक्यातील पिचर्डे येथील सासर असलेल्या 31 वर्षीय विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पिचर्डे येथील एका विरोधात मेहुणबारे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून विवाहीतेने त्रासाला कंटाळून12 जानेवारी 2017 रोजी सायंकाळी 4:30 वाजेच्या सुमारास बहाळ येथे विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती.
मानसिक धक्क्यातून विवाहितेने विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या
बहाळ ता. चाळीसगाव येथे 12 जानेवारी 2017 रोजी सायंकाळी 4:30 वाजेच्या सुमारास रेखा अनिल महाजन (31) रा. (पिचर्डे ता.भडगांव) या विवाहीतेने गावालगत असलेल्या अर्जुन माळी व मधुकर शिरूडे यांच्या शेतातील विहीरीत उडी घेऊन आपली जीवन यात्रा संपविली होती. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली होती. याप्रकरणी विवाहीतेचे पती अनिल भगवान महाजन रा. पिचर्डे ता. भडगाव यांचा पोलीसांनी जाब – जबाब घेतल्यानंतर त्यांनी याबाबत माहीती देतांना पोलीसांना सांगितले कि, पिचर्डे येथील गावातीलच गोकुळ सिताराम पाटील याने विवाहीता रेखा महाजन यांचा 28 जुलै 2016 रोजी विनयभंग केल्याने त्याचे विरोधात भडगाव पोलीस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर वारंवार आरोपी सदर विवाहीतेला बरे-वाईट बोलून त्रास देत असत.
मात्र बदनामीच्या भितीने हा प्रकार त्यांनी कुणालाही सांगितला नाही. गोकुळ पाटील याने 6 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास महीलेचा पुन्हा विनयभंग केला. त्यावेळी विवाहीतेने आरडा-ओरड केल्याने त्याने तेथून पलायन केले. या प्रकाराने सौ. रेखा महाजन यांना मानसिक धक्का बसला होता. या मानसिक धक्क्यातूनच आरोपी गोकुळच्या त्रासाला कंटाळून त्यांनी विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची फिर्याद मेहुणबारे पोलीस स्टेशनला दिल्यावरून विवाहीतेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गोकुळ सिताराम पाटील रा. पिचर्डे ता. भडगांव याचे विरोधात मेहुणबारे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि शिरसाठ
करीत आहेत.