विनयभंग करणार्‍या एजंटला महिलेने चोपले

0

पुणे । विनयभंग केला म्हणून अनधिकृत खासगी ट्रॅव्हल्सच्या एजंटला एका महिलेने चोप देत पोलिसांच्या हवाली केल्याची घटना शनिवार रात्री 11.30 वाजता रवीदर्शन येथे घडली. सदरीला महिला ही मगरपट्टा येथे राहण्यास असून ती सोलापूर येथे जात होती. तिकीटावरून येथील ट्रॅव्हल एजंट रूपेश ज्ञानोबा गव्हाणे (रा. दुगड चाळ) याने या महिलेसोबत अश्‍लील वक्तव्य करत तिचा विनयभंग केला.

यापूर्वीही गव्हाणे व त्याच्या साथीदारांविरोधात वाईट वर्तणुक, धमक्या देणे, दहशत निर्माण करण्याच्या तक्रारी पोलिसांकडे केल्या आहेत. पण हडपसर पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याची चर्चा नागरीकांमध्ये आहे. महिलेने विनयभंग केल्याची तक्रार करू नये, याकरीता गव्हाणे याच्या ट्रॅव्हल व्यवसायातील साथीदारांनी त्यांना दमदाटी करण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. के. एस. लोंढे यांनी तक्रार दाखल करून घेतली असून पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक निकम करीत आहेत.

दररोज होते महिलांची छेडछाड
रविदर्शन, साधना, बँक, आकाशवाणी येथे सोलापूर, गुलबर्गा, लातूर, हैद्राबाद याठिकाणी जाण्याकरीता हजारो प्रवासी सायंकाळी 7 ते रात्री 2 वाजेपर्यंत उभे असतात. अनधिकृतपणे शेकडो खासगी ट्रॅव्हल्स बसेस उभ्या राहील्याने वाहतूक कोंडी, गुंडगिरी, दमदाटी, दारू पिऊन धिंगाणा घालणे, असे प्रकार या खासगी ट्रॅव्हल एजंटाकडून वारंवार घडत आहेत. महिला व तरुणींच्या छेडछाडीचे प्रकार येथे रोज घडतात. पण या गुंडांच्या दहशतीने हे प्रकार उघडकीस येत नाहीत, असेही येथील स्थानिक सोसायट्यांमधील रहिवासी सांगत आहेत. त्यामुळे हडपसर पोलिसांनी कडक कारवाई करून येथील अनधिकृत बसेसचे थांबे 15 नंबरच्या पुढे हलवावे, बसगाड्यांकरीता शेवाळवाडी येथील नाका उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी हिंदवी स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष अभिजीत बोराटे व स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेली आहे.