विनाअनुदानीत शिक्षकांचे आझाद मैदानावरील आंदोलन सुरुच

0

अमळनेर । कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांना शंभर टक्के अनुदान व तात्काळ वेतन सुरु करण्यात यावा, यासाठी राज्य विनाअनुदानीत उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय कृती समितीच्या वतीने राज्यभरात आंदोलन सुरू आहे. 1 ऑगस्टपासून सर्व महाविद्यालये बंद करून आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलनास दहा दिवस होत आले असून अद्यापही आंदोलन सुरुच आहे. परिणामी राज्यातील सुमारे 12 लाख विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

परंतु सदर नुकसानासाठी राज्याचे शिक्षणमंत्री व मुख्यमंत्रीच जबाबदार आहेत, असे वक्तव्य समितीचे अध्यक्ष प्रा.तानाजी नाईक यांनी केले. कृती समितीची शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी चर्चा झाली असता अर्थखाते आर्थिक तरतुद करण्याची तयारी दर्शवत असेल तर सभागृहात याद्या घोषित करतो असे सांगितले. कृती समितीने आमदार शिरीष चौधरी यांना सोबत घेवुन अर्थमंत्री यांच्या सोबत चर्चा घडवून आणली. यावेळी अर्थमंत्री म्हणाले की मी शिक्षण विभागाला 55 हजार कोटी दिलेत त्यातून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा पगार करावा तसे निवेदनावर टिपण केले. आमदार चौधरी यांच्या पुढाकाराने प्रश्न नक्की मिटणार असा विश्वास शिक्षकांना व्यक्त केला आहे. त्यांचे आभार कृती समिती राज्यध्यक्ष नाईक सर अनिल परदेशी अमर खांडेकर यांनी केले. अनेक शिक्षक अजूनही आझाद मैदानात येत आहेत. शासन स्तरावर जोपर्यंत अनुदानपात्र कनिष्ठ महाविद्यालयांच्या याद्या घोषित होत नाहीत तोपर्यंत विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांचा बेमुदत बंद व आझाद मैदानात सुरु असलेले अंदोलन कुठल्याही परिस्थितीत मागे घेण्यात येणार नाही, असे महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय कृती समितीचे अध्यक्ष प्रा.तानाजी नाईक, राज्य संपर्क प्रमुख प्रा.अनिल परदेशी, अमरावती विभाग प्रमुख प्रा.संतोष वाघ यांनी सांगितले आहे.