मुंबई- देशात सरकारी पाठिंब्याने गोरक्षकांची जमात मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे. बीफ हे फक्त अल्पसंख्याकांचे खाद्य नाही. गरीब वर्गातील दलितही बीफ खातात. गरीबांना त्यातून पुरेसा प्रोटीनचा पुरवठा मिळतो. पण गायींची भीती दाखविण्याचा प्रयत्न या तथाकथित भाजपाच्या गोरक्षकांकडून करण्यात येत आहे. जे बेकायदेशीर आहे त्याला विरोधच असला पाहिजे. पण गोरक्षक विनाकारण कुणाला मारत असतील तर त्यालाही जोरदार विरोध केला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरूवारी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा नरिमन पॉंईट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. उत्तर प्रदेशमध्ये विजय मिळाला म्हणजे देशात सगळीकडे भारतीय जनता पार्टीचे वातावरण आहे, असे नाही. पंजाब, मणिपूर आणि गोव्यात भाजपाला चांगले यश मिळाले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी पुन्हा पेटवा मशाली, या कवी सुरेश भट यांच्या कवितेतील ओळीनुसार निवडणुकीच्या तयारीला लागावे, असे आवाहनही त्यांनी केले.
देशातील आणिबाणी उठवल्यानंतर १९७७ साली झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव झाला. त्यावेळी पुढील २५ वर्षे काँग्रेस सत्तेत येणार नाही, अशी भाकिते करण्यात आली. मात्र, पुन्हा झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसच सत्तेवर आली. सत्ताधाऱ्यांना देशात काही भूमिका मांडण्य़ात यश आले तरी ते कायम राहील असे नाही. उत्तर प्रदेशमध्ये सर्व अल्पसंख्याक समाजाने भाजपाला मते दिल्याचा दावा भाजपाकडून करण्यात येत आहे. हा दावा खोटा असून मतांचे पोलरायझेशन झाल्याने आणि समाजवादी पक्षाच्या काही चुकांमुळे भाजपाला जास्त जागा मिळाल्या, असेही पवार म्हणाले.
राज्यात लोकसभेबरोबर विधानसभेचीही निवडणूक होऊ शकते. त्यामुळे दोन्ही निवडणूका एकत्र लढण्यासाठी आतापासून तयारी करावी लागणार आहे. लोकांच्यात राहून संघर्ष करण्याची मानसिकता आपण बनवली पाहिजे. भाजपाला शिवसेनेच्या मतांची गरज असल्याने दोन्हीही पक्ष त्यांच्यात अंतर येऊ देणार नाही. विरोधी पक्षांच्या संघर्षयात्रेला चांगला प्रतिसाद मिळाल्याने सरकारकडून त्याला प्रत्युत्तर देण्यात येत आहे, असेही शरद पवार म्हणाले.
भाजपा उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत कर्जमाफीची घोषणा करते. मग हाच नियम इतर राज्यासाठी का नाही? आत्महत्त्या करणार्याा राज्यांपैकी महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. नोटाबंदीनंतर महाराष्ट्रात २६०० कोटी रूपयांच्या नोटा बदलून दिलेल्या नाहीत. त्या बँकेत पडलेल्या आहेत. सहकारी बँकेत केवायसी अंतर्गत सर्व खात्याची पडताळणी झाली तरी नोटा बदलून दिलेल्या नाहीत. विना व्याज इतके पैसे पडून आहेत. त्यामुळे ५२ टक्के लोकांना कर्जपुरवठा झाला नाही. याला भाजपाच जबाबदार आहे, असेही पवार यांनी सांगितले.