प्रांताधिकारी दीपमाला चौरे यांच्या आदेशानुसार धडक कारवाई
जळगाव – जळगाव लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गुलाबराव देवकर यांचा फोटो आणि पक्ष चिन्ह विनापरवानगी वाहनांवर लावुन प्रचार करणार्या ११ वाहनचालकांविरूध्द रामानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
जळगाव लोकसभेचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्यामागे संकटांचे शुक्लकाष्ट लागले आहे. ऐन निवडणुकीच्या प्रचारकाळातच त्यांच्याविरूध्द प्रांताधिकारी दीपमाला चौरे यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली. यात शहरातील आकाशवाणी चौकात मजूर फेडरेशनच्या कार्यालयाजवळील सार्वजनिक ठिकाणी गुलाबराव देवकर यांची प्रतिमा व पक्षाचे चिन्ह असलेली ११ वाहने उभी होती. या वाहनांची भरारी पथकाने तपासणी केली. तपासणीवेळी संबंधित वाहनचालकांना परवानगीची प्रत मागितली असता ती मिळून आली नाही. सक्षम अधिकार्यांकडुन परवानगी न घेता राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करणार्या या ११ वाहनचालकांबाबत भरारी पथकाने प्रांताधिकारी दीपमाला चौरे यांना कळविले असता त्यांनी गंभीर दखल घेऊन तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सुभाष हिम्मतराव पाटील (वय ५४) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामानंद पोलीस ठाण्यात विनापरवानगी राष्ट्रवादीचा प्रचार करणार्या ११ वाहनचालकांविरूध्द भादवि कलम १८८, मोटारवाहन कायदा कलम १७७ सह मोटार वाहन नियम २३२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि सचिन बेंद्रे हे करीत आहे.
गुन्हा दाखल झालेली वाहने
अॅपे रिक्षा क्र. एमएच १९ व्ही.३४०६, एमएच १९ सीडब्ल्यु १६०४, एमएच १९ व्ही ०५५४, एमएच १९ व्ही. ८५५४, एमएच १९ डीसी १९९४, एमएच १९ सीएफ १८२०, एमएच १९ एआर ३२२२, एमएच १९ सीडब्ल्यु २२१३, एमएच १९ व्ही. ०८४९, एमएच १९ सीडब्ल्यु १६६४, एमएच १९ सीडब्ल्यु ७००० अशा ११ वाहनचालकांविरूध्द रामानंद पोलीसात गुन्हा दाखल आहे.