विनापरवाना गैरहजर राहिलेल्या वैद्यकीय अधिकार्‍याची खातेनिहाय चौकशी सुरु

0

पिंपरी-चिंचवड : कोणतीही परवानगी न घेता 540 दिवस गैरहजर राहिलेला महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वरुप आप्पासाहेब गायकवाड यांची खातेनिहाय चौकशी सुरु केली आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी तसा आदेश काढला आहे. डॉ. गायकवाड हे पिंपरी पालिकेच्या थेरगाव येथील रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी या गट ’ब’ दर्जाच्या पदावर कार्यरत आहेत.

रजेची मागणी अमान्य
गायवाड यांनी वरिष्ठांकडे रजेची मागणी केली होती. मात्र ती मान्य झाली नाही. याबाबत त्यांना कल्पना देखील दिली होती. 8 फेब्रुवारी 2016 ते 31 जुलै 2017 असे तब्बल 540 दिवस ते विनापरवाना गैरहजर राहिले. याबाबत त्यांना वेळोवेळी नोटीस बजाविण्यात आली होती. परंतु, त्यांनी कोणताही खुलासा केला नाही, असा अहवाल आरोग्य वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिला आहे.

सेवा नियमाचा भंग
गायकवाड विनापरवाना गैरहजर राहिल्यामुळे रुग्णालयीन अत्यावश्यक सेवेच्या कामकाजामध्ये अडथळा निर्माण झाला. त्यांच्या गैरवर्तनामुळे महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम 1979 मधील नियम तीनचा भंग झालेल्या आहे. त्यामुळे महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील कलम 56 (1) चे तरतुदींच्या अधिन, महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1979 च्या नियम आठनुसार खातेनिहाय चौकशी सुरु करण्याचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत. या आदेशाची नोंद त्यांच्या सेवानोंद पुस्तकातही घेण्यात येणार आहे.