येरवडा । कोरेगाव पार्क व परिसरात अनेक हॉटेल्स व्यावसायिकांनी बेकायदेशीर रित्या आपले बस्तान बसवले आहे. विशेष म्हणजे अनेक व्यावसायिकांकडे वाहनतळच नसल्याने हॉटेलमध्ये येणारे ग्राहक हे रस्त्यावरच वाहने उभी करत असल्यामुळे या मार्गावर वाहतूककोंडी ही नित्याची ठरली असून याचा नाहक त्रास इतर वाहनचालकांना सहन करण्याची वेळ येत आहे. काही हॉटेल्सकडे केटरिंग व अन्नधान्य खाद्यविभागाचा परवानाही नाही. हॉटेल्सबरोबर चालणारी पब संस्कउतीही वाढत आहे. अशा हॉटेल्सवर कायदेशीर कारवाई केली जावी, अशी मागणी स्थानिक नागरिक व राष्ट्रीय परिवर्तन संघटनेने केली आहे.
तक्रारींकडे दुर्लक्ष
याबाबत अनेकदा पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्याकडे वारंवार तक्रार करून देखील दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.तर रात्री-मध्यरात्रीच्या सुमारास अनेक तरुण-तरुणी हे नशेत दंग चित्र पाहायला मिळत आहे. याबरोबरच मसाज पार्लरच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात अवैध धंदे तेजीत आहेत.
पालिकेचा लाखो रुपयांचा महसूल बुडीत
कोरेगाव पार्क ह्या भागात परदेशातील नागरिक मोठ्या प्रमाणात स्थायिक झाल्याने परिसराला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून उच्चभ्रू सोसायटी म्हणून या भागाकडे पाहिले जात आहे. त्यातच ह्या ठिकाणी खासगी कंपन्यांचे जाळे पसरले आहे. त्यामुळे येथील व्यवसाय तेजीत आहे. पालिकेची कोणत्याही प्रकारे परवानगी न घेता टोलेजंग इमारतीमध्ये हॉटेल्स उभारल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच अनेक व्यावसायिकाकडे केटरिंगचा कोणत्याही प्रकारे पालिकेचा परवाना नसल्याने पालिकेचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. त्याकडे पालिका प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा दावा केला आहे. याबरोबरच परिसरात हॉटेलसह क्लब,पब हे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने रात्रीच्या सुमारास पबमधून ध्वनीचा आवाज 3-4 किमी अंतरापर्यंत आवाज ऐकू येतो. त्याचाही स्थानिकांना त्रास सहन करावा लागतो.
पोलिसयंत्रणा सक्षम आहे का?
यासंदर्भात जनतेने न्याय मागायचा कोणाकडे? असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. बेकायदेशीर सुरू असलेल्या हॉटेल्स व्यावसायिकांवर कारवाई करणे गरजेचे बनले आहे. जनतेचे प्रश्न सोडविण्यास पोलिसयंत्रणा खरोखर सक्षम आहे का? ते यावरून स्पष्ट होत आहे.
– राकेश वाल्मिकी, संस्थापक अध्यक्ष,
राष्ट्रीय परिवर्तन संघटना