विनायक दळवी यांना क्रीडा पत्रकारिता पुरस्कार

0

मुंबई। मुंबई मराठी क्रीडा पत्रकार संघाने राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून मंगळवारी आपल्या पहिल्या क्रीडा पत्रकारिता पुरस्काराची घोषणा केली . गेली 38 वर्षे क्रीडा पत्रकारितेत भरीव योगदान देणार्‍या ज्येष्ठ क्रीडा पत्रकार विनायक दळवी यांची या क्रीडा पत्रकारिता पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी जाहीर केले. या वर्षापासून प्रतिवर्षी स्व. महेश बोभाटे क्रीडा पत्रकारिता पुरस्काराने उत्कृष्ट क्रीडा पत्रकारांना गौरविले जाणार आहे. लवकरच एका कार्यक्रमाचे आयोजन करून दळवींना या पुरस्काराने सन्मानित केले जाईल.

दैनिक दिव्य मराठीत क्रीडा पत्रकार म्हणून कार्यरत असलेल्या श्री. विनायक दळवी यांनी गेली चार दशके निर्भीड क्रीडा पत्रकारिता करून मोठे योगदान दिले आहे. तसेच दळवी यांनी यापूर्वी लोकसत्ता आणि सकाळ या प्रसिद्ध दैनिकांमध्ये तब्बल 32 वर्षे क्रीडा संपादक म्हणून जबादारी पार पाडली होती.

चार दशकांचा अनुभव
चार दशकांच्या दीर्घ वाटचालीत चार ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचे वार्तांकन करण्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे. त्यात अथेन्स (2004), बीजिंग (2008), लंडन (2012) आणि रिओ ऑलिम्पिक (2016) या ऑलिम्पिकचा समावेश प्रामुख्याने करावासा वाटतो. त्याशिवाय, आशियाई क्रीडा स्पर्धांचे वार्तांकनही त्यांनी केले. त्यात भारतात(दिल्ली) झालेली पहिली आशियाई क्रीडा स्पर्धा (1982) आणि बीजिंग येथे 1990मध्ये झालेली आशियाई क्रीडा स्पर्धा यांचा
समावेश आहे.

कबड्डीपटूंवर पुस्तक लिहिले

क्रिकेट, ऑलिम्पिक यांच्याव्यतिरिक्त देशी खेळांचेही भरपूर वार्तांकन त्यांनी केले आहे. नामवंत कबड्डीपटूंवर कबड्डीचे किमयागार हे पुस्तक त्यांनी लिहिले आहे. विशेष म्हणजे तत्कालिन राज्य कबड्डी संघटनेचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे. या प्रदीर्घ वाटचालीत अनेक सदरे त्यांनी वर्तमानपत्रांसाठी लिहिली. त्यात 1983च्या विश्‍वचषक स्पर्धेवर झरोका हे सदर त्यांनी लिहिले. 2007च्या विश्‍वचषक स्पर्धसाठी कॅलिप्सो बीटस, 2011 च्या विश्‍वचषकदरम्यान पॉवरप्ले व 2008च्या बीजिंग ऑलिम्पिकदरम्यान चायना गेटही सदरे त्यांनी लिहिली आणि त्यांना वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसादही लाभला. क्रीडापत्रकारितेतील या प्रवासादरम्यान अनेक पुरस्कार व सन्मानांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. साहित्य परिषदेचा उत्कृष्ठ लिखाणाबद्दलचा पुरस्कार त्यांना मिळाला असून महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनकडून देशी खेळांवरील लिखाणासाठीचा पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. त्याशिवाय, शिवछत्रपती पुरस्कार समितीचे सदस्य म्हणून दोन वर्षे त्यांनी काम केले.