कॅनबेरा : मानवाच्या जंगलतोड, प्रदूषण अशा विघातक कृतीमुळे निर्मित हवामान बदलामुळे पुढील १०० वर्षात समुद्राच्या पाण्याच्या पातळीत प्रचंड वाढ होणार आहे. इंटर गव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंजमधील वैज्ञानिकांनी ही भीती व्यक्त केलीय. त्यांनी सिरियातील दुष्काळ आणि फ्रान्समधील पूर ही आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे असे म्हटले आहे.
ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीच्या कार्यक्रमात बोलताना पॅनेलचे वैज्ञानिक व्हेलरी मॅसन डेलमोट म्हणाले ग्रीनलँडच्या भागावरील बर्फाच्छदन वितळत असल्यामुळे जगातील समुद्रांची पातळी वाढणार आहे. हवामान बदल हे मानवनिर्मित संकट आहे. हवामान बदलामुळे आर्कक्टीक, फ्रान्स, सिरिया येथे बदल झाले. सिरियामध्ये २००७ ते २०१२ मध्ये पाऊस न पडल्यामुळे आणि तापमानात वाढ झाल्याने दुष्काळ पडला. भूमध्यसागरातील क्षेत्रात मोठे हवामान स्थित्यंतर झाले. फ्रान्समध्ये प्रचंड पूर आला तो हवामान बदलामुळेच. उबदार समुद्र आणि उबदार हवेमुळे आर्द्रता वाहून नेली जाते आणि मग अतिवृष्टी होते असे वैज्ञानिक सांगतात