जळगाव । राज्य सरकारने 3 हजार 700 शाळांचे प्रश्न सोडविले असून विना अनुदानित शाळांना 20 टक्के अनुदान सुरु केले आहे. हळूहळू हे अनुदान 100 टक्के करण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जळगाव येथील भाजपाच्या कार्यक्रम प्रसंगी सांगीतले. नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुक 2018 साठी भाजपाचे उमेदवार अनिकेत पाटील यांच्यासाठी शनिवारी पदमावती सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
आ.सुरेश भोळ, भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ, जि.प.शिक्षण सभापती पोपटतात्या भोळे यांनी राज्य सरकारने शिक्षकांच्या व शिक्षणसंस्थांसाठी घेतलेले चांगले निर्णय विषद केले. तसेच अनिकेत पाटील यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्याच निर्धार केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ तर मंचावर ना.चंद्रकांत पाटील, आ.सुरेश भोळे, आ.स्मिता वाघ,जि.प.अध्यक्षा ना. उज्वला पाटील, जि.प.चे शिक्षण सभापती पोपटतात्या भोळे, जि.प.सदस्या हर्षल पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्षा अस्मिता पाटील, शिक्षक संघटनेचे मनोज पाटील, अॅड.किशोर काळकर, मधु काटे,गोविंद अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
अनिकेत पाटलांना प्रचंड मतांनी निवडून आणण्याचा निर्धार
ना.चंद्रकांत पाटील यांनी विद्यार्थी परिषदेची भुमिका अनिकेत पाटील निभावत आहेत असे सांगितले. केवळ निवडणुक जिंकण्यासाठी फिरायचे नसुन शासनाची धैय्य धोरणे लोकांपर्यंत पोहचवायची आहेत असे आवाहन केले. 2002 साली सरकारने अनेक शाळांना व महाविद्यालयांना परवानगी दिली होती. परंतु, यासंस्था सरकारकडे पगार मागणार नाहीत असे स्पष्ट केले होते. कायम विना अनुदानीत असे वाक्य होते. आम्ही पाठपुरावा करुन कायम हा शब्द काढून टाकला.या सरकारने विना अनुदानीत शाळांना 20 टक्के अनुदान सुरु केले असुन हळुहळु 100 टक्के अनुदान दिले जाईल. राज्यातील 3 हजार 700 शाळांचा प्रश्न सोडविला आहे. कनिष्ठ महाविद्यायांचे प्रश्न मार्गी लावले आहेत. शाळांना खर्चासाठी या सरकारने वेतनेतर अनुदान सुरु केले. शिक्षकेतर कर्मचारी भर्ती बंद होती, ही भरती सुरु केली.