पुणे : सूचना न देता विना अर्ज कामावर गैरहजर राहणार्या पुणे महानगर परिवहन (पीएमपी) महामंडळाच्या 13 कर्मचार्यांना सुटी चांगलीच महागात पडली आहे. कामावर गैरहजर राहिल्याबद्दल या दांडीबहाद्दर कर्मचार्यांना पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी प्रत्येकी पाच हजारांचा दंड ठोठावत कारणे दाखवा नोटीस बजावून लेखी खुलासा मागितला आहे.
विना अर्ज सुटी घेऊन कामावर गैरहजर राहिल्याबद्दल नरवीर तानाजी वाडी डेपोतील 13 बसचालकांवर आगार व्यवस्थापकांच्या स्वाक्षरीने कारणे दाखवा नोटीस बजावून ही कारवाई करण्यात आली. चालकांनी अचानक सुटी घेत कामाला दांडी मारल्याने मार्गावरील नियोजित वेळापत्रक बिघडले असून प्रवाशांची गैरसोय झाले आहे. परिणामी महामंडळाची प्रतिमा जनमानसात मलीन झाली असून आर्थिक नुकसान झाले आहे. आपल्या कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याचा ठपका संबंधित कर्मचार्यांवर ठेवण्यात आला असून झालेल्या आर्थिक नुकसानीपोटी 5 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. अचानक कामावर गैरहजर राहिल्याप्रकरणी तीन दिवसांत लेखी खुलासा सादर करण्याची संधी संबंधित कर्मचार्यांना देण्यात आली होती. मात्र, कर्मचार्यांनी कोणताही खुलासा न केल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. यापूर्वीही कर्मचारी पूर्वसूचना न देता सुट्या घेऊन महिनाअखेरीस अर्ज देऊन रजिस्टरमध्ये नोंदणी करून घेत असत. मात्र, आता या दांडीबहाद्दर कर्मचार्यांना वठणीवर आणण्यासाठी थेट दंड ठोठावण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे.