जळगाव। शहरातील शिवाजीनगर पोलिस चौकीजवळ विनापरवाना वाळु वाहतुक करतांना डंपर तलाठ्यास मिळून आले होते. डंपर व चालकावर कारवाई करत शहर पोलिसांच्या ताब्या देण्यात आले होते. दरम्यान, आज बुधवारी डंपरचालकास न्यायालयात हजर केले असता 21 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
आरोपीला 21 जुलैपर्यंत मिळाली कोठडी
मंगळवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास चालक संदीप उर्फ भुरा मधुकर कोळी वय-30 हा डंपर क्रं. एमएच.19.झेड.4858 मधून विनापरवाना चार हजार रुपये किंमतीची 2 ब्रास वाळु वाहतुक करीत असतांना तलाठी अनिरूध्द रमेश खेतमाळस यांना आढळुन आला. डंपरसह चालकावर कारवाई करत खेतमाळस यांनी डंपर व चालक संदिप याला शहर पोलिसांच्या ताब्यात देत तक्रार दिली. त्यानुसार डंपरचालकासह मालकाविरूध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आज बुधवारी डंपरचालक संदिप कोळी याला न्यायाधीश कांबळे यांच्या न्यायालयात हजर करण्यात येवून न्या. कांबळे यांनी त्याला 21 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. याप्रकरणी सरकारपक्षातर्फे अॅड. आशा शर्मा यांनी कामकाज पाहिले.
माजी आमदारांच्या गाडीची रिक्षाला धडक
जळगाव। एरंडोल विधानसभेचे माजी आ.महेंद्रसिग पाटील यांच्या चारचाकी वाहनाने बुधवार रोजी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास रिक्षास धडक दिल्याची घटना घडली. माजी आ. महेंद्रसिंग पाटील यांची चारचाकी क्र. एमएच 19 बीई 1111 ही जळगाव बसस्थानकाकडून स्वातंत्र्यचौकाकडे जात असतांना गांधी उद्यानाकडुन जिल्हा पोलीस मुख्यालयाकडे वळण घेणार्या रिक्षा क्र. एमएच 19 व्ही 1756 ला धडक दिली. यात रिक्षा पलटी झाल्याने चालकास थोडा मारा लागला. चालकास जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रिक्षाचे किरकोळ नुकसान झाले. या अपघातानंतर गर्दी जमा झाली होती.