विना परवाना वाळू वाहतुक करणारे ट्रॅक्टर पकडले

0

जळगाव। जिल्हा प्रशासन तसेच महसुल विभागाकडून अवैधरित्या वाळु वाहतुक करणार्‍यांवर कारवाईचे धाडसत्र सुरू केलेले आहे. त्यानुसार मंगळवारी सकाळी हॉटेल रॉयल पॅलेस समोरून तर वाघ नगर रिक्षा स्टॉपजवळून वाळु वाहतुक करणारे दोन ट्रॅक्टर तहसिलदार अमोल निकम यांनी पकडले. याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात दोन्ही ट्रॅक्टरांच्या चालक मालकविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील विविध नदीपात्रातून अवैध्य वाळू उपसा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून कारवाई सत्र राबविण्यात येवून डंपर व ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात येत आहे. मंगळवारी हॉटेल रॉयल पॅलेससमोरून अवैध्यरित्या वाळु भरलेले एमएच.19.एपी.8751 हे ट्रॅक्टर जात होते. सकाळी 8.58 वाजेच्या सुमारास तहसिलदार अमोल निकम व तलाठी मिलींद सुरेश बुवा यांनी हे ट्रॅक्टर अडवून चालकाकडे परवाना व कागपत्रांची मागणी केली. परंतू कागपत्र व परवाना चालकाकडे नसल्याचे पाहून तलाठी मिलींद सुरेश बुवा यांच्या फिर्यादीवरून 1 ब्रास वाळु चोरी केल्याप्रकरणी महेंद्र सुधाकर सपकाळे व आसिफ शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास फेगडे हे करीत आहेत. यानंतर दुसर्‍या कारवाईत तहसलिदार यांनी पुन्हा सकाळी 10.50 वाजेच्या सुमारास गस्तीदरम्यान वाघनगर रिक्षास्टॉपजवळून तीन हजार रूपये किंमतीची 1 ब्रास वाळु वाहतुक करून घेवून जात असलेले ट्रॅक्टर (क्रं.एमएच.19.5045) अडवून चालकास परवानाबाबत विचारपूस केली. परवाना नसल्याने वाळु व ट्रॅक्टर ताब्यात घेत चालकावर कारवाई केली. यानंतर फिरोज खान अय्युब खान यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात विनोद कन्हैय्या पवार व कैलास दत्तात्रय पवार यांच्याविरूध्द रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पूढील तपास विजय निकुंभ हे करीत आहेत.