विनोदी मल्टीस्टार्सचा ‘वाघेर्‍या’ चित्रपट लवकरच सिनेमागृहात येणार

0

मुंबई । एप्रिल महिन्याची सुरुवात म्हटली की ’एप्रिल फुल’ला उधाण येते. एप्रिलच्या कडक उन्हाळ्यात हास्याचा पाऊस पाडणार्‍या या ‘फुल’ची मज्जा प्रत्येकजण घेत असतो. हीच मज्जा घेऊन मराठीतील काही दिग्गज कलाकार खास एप्रिल फुलच्या निमित्ताने लोकांसमोर येत आहे. माणसांना रडवणे खूप सोपे असते, मात्र हसवणे त्याहून कठीण. म्हणूनच तर प्रेक्षकांच्या चेहर्‍यावर हास्य येण्यासाठी विनोदवीरांना अनेक मशागत करावी लागते. मायबाप प्रेक्षकांच्या एका हसूसाठी आपल्या दर्जेदार अभिनयाद्वारे विनोदाचा स्तर उंचावणारे असे अनेक दिग्गज कलाकार आपल्याला मराठीत पाहायला मिळतात.

सर्व भन्नाट विनोदवीरांचा बंपर पॅकेज
अशा या सर्व भन्नाट विनोदवीरांचा बंपर पॅकेज असलेला ‘वाघेर्‍या’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांसमोर येत आहे. गौरमा मीडिया अ‍ॅन्ड एन्टरटेंटमेंट प्रा. लि. आणि वसुधा फिल्म प्रॉडक्शननिर्मित तसेच सुप्रीम मोशन पिक्चर्सचे लालासाहेब शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांची प्रस्तुती असलेल्या या सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शक समीरआशा पाटील यांनी केले आहे. धम्माल विनोदीपट असलेल्या या चित्रपटात किशोर कदम, भारत गणेशपुरे, हृषीकेश जोशी, सुहास पळशीकर, नंदकिशोर चौघुले, लीना भागवत आणि छाया कदम यांसारख्या अनुभवी आणि मातब्बर कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

सुट्टीत प्रेक्षकांना हास्याची चटकदार मेजवानी
उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रेक्षकांना हास्याची चटकदार मेजवानी देण्यास येत असलेल्या या सिनेमाचे राहुल शिंदे आणि केतन माडीवाले निर्माते आहेत. नाटक, मालिका आणि चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना लोटपोट हसवणारे हे विनोदवीर प्रथमच ’वाघेर्‍या’ या सिनेमाच्या निमित्ताने एकत्र आले असल्यामुळे, या सिनेमाद्वारे विनोदाचा वारू चौफेर उधळणार हे निश्‍चित!