मुंबई । राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज या निवासस्थानी जाऊन सोमवारी भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. सुमारे तासभर तावडे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाल्याचे सुत्रांनी सांगितले. येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. तसेच ठाण्यात होऊ घातलेल्या नाट्य संमेलनाचे निमंत्रण देण्यासाठी विनोद तावडे गेल्याचीही चर्चा होती.
विधानपरिषदेच्या रिक्त होणार्या जागेसाठी, पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. यामध्ये भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना रंगण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्या भेटीमध्ये विधानपरिषद निवडणुकीबद्दल चर्चा झाल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. तसेच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीबद्दल देखील चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे.