विप्रो कागदपत्रांच्या पडताळणीबाबत चौकशी करावी

0
माहिती अधिकार कार्यकर्त्याची पोलिसांकडे मागणी
तळेगाव दाभाडे : कामगारांचे आर्थिक शोषण करणे तसेच कामगारांना दुय्यम वागणूक देण्यात येत असल्या प्रकरणी तळेगाव दाभाडे येथील विप्रो लॅबोरेटरीज प्राइवेट लिमिटेड या कंपनीची चौकशी करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी तळेगाव दाभाडे पोलिसांकडे केली. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) नारायण पवार यांना याबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी मानवाधिकारचे संतोष दाभाडे यावेळी उपस्थित होते.
कंपनीतील महिलांचे मानसिक, आर्थिक शोषण
पोलिसांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कंपनीत कार्यरत असणार्‍या महिला-भगिनींचे कंपनी प्रशासन मानसिक व आर्थिक शोषण करत आहे. तसेच त्यांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात आहे. कंपनीमधील कार्यरत महिला व पुरुष कर्मचार्‍यांना ठराविक वेळेपेक्षा धमकावून अतिरिक्त वेळ थांबून काम करून घेतले जात आहे. अधिक कामाचा कोणताही मोबदला कामगारांना दिला जात नाही. महिलांची प्रसूती रजा नाकारणे, परमनंट कामगारांना कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय कामावरून काढून टाकण्याचे प्रकार समोर आले आहेत. हार्मफुल केमिकल स्मॉल मॉलिक्युलर मनुफॅक्चरिंगची परवानगी, केमिकल वेस्ट डिस्पोजल योग्य पद्धतीने होत आहे किंवा नाही याबाबतची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.