विभाग नियंत्रकांच्या चेहर्‍यावर फवारला मिरची पाण्याचा स्प्रे

0

नवीन बसस्थानकात अक्क्लकुवा येथील महिला वाहकाचे कृत्य ः गुन्हा दाखल


जळगाव: अक्कलकुवा येथे कार्यरत असतानांच्या जुन्या वादातून तेथील महिला वाहक सुनीता लोहार यांनी जळगाव एस.टी. महामंडळाचे विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांच्या डोळ्यात मिरची पावडरचे पाणी केलेला स्प्रे फवारल्याची घटना गुरुवारी सकाळी 10 वाजता नवीन बसस्थानकात घडली. याप्रकरणी वाहक सुनीता लोहार यांच्याविरुध्द जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून लोहार यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेच जळगाव बसस्थानकात कर्मचार्‍यांतर्फे निषेध व्यक्त करण्याला असून कारवाईसाठी पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे.

देवरे यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, गुरुवारी सकाळी 10 वाजता कार्यालयाच्या जिन्याच्या खाली साफसफाई बाबत स्थानक प्रमुख निलीमा बागुल यांना सूचना देत असताना अक्कलकुवा आगाराच्या वाहक सुनिता लोहार या देवरे यांच्या दालनाकडून आरडाओरड करीत जिन्याकडे आल्या व काही कळण्याच्या आतच त्यांनी मिरची पावडरचे पाणी बाटलीच्या स्प्रेमधून देवरे यांच्या उजव्या डोळ्यात फवारले. तत्काळ निलीमा बागुल यांच्यासह कर्मचार्‍यांनी तत्काळ पाणी आणून देवरे यांच्या चेहर्‍यावर मारले. तसेच देवरे यांनी डोळे धुतले. प्रचंड आग व भोवळसारखा प्रकार झाल्याने कर्मचार्‍यांनी देवरे यांना खासगी डोळयांच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलविले. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर देवरे जिल्हा पेठ पोलिसात सुनिता लोहार यांच्याविरुध्द तक्रार दिली. त्यानुसार कलम 326 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहक महिलेस ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक अकबर पटेल यांनी महिलेकडून प्रकार जाणून घेतला.

निलंबनाच्या कारवाईने वाद चिघळला

राजेंद्र देवरे हे पेट्रोपंप परिसरातील शिवसंग्राम कॉलनीत कुटुंबासह वास्तव्यास आहेत. ते दोन वर्षापासून जळगाव बसस्थानक आगारात विभाग नियंत्रक म्हणून कार्यरत आहेत. देवरे हे अडीच वषार्पूर्वी धुळे विभागात नियंत्रक म्हणून कार्यरत होते. त्यावेळी वाहक सुनिता लोहार यांच्याविरोधात डेपोमध्ये अनेक तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या. तसेच महिलेचे वर्तन अरेरावीचे, वरीष्ठांचे काही एक ऐकुन न घेता वादविवाद करण्यासारखे होते. सात आठ तक्रारीवरून महिलेचा निलंबनाचा प्रस्ताव वरीष्ठ कार्यालयाकडे पाठवुन तिला निलंबित केले होते. याचा राग धरून लोहार यांनी देवरे यांच्यावर मिरची पुड स्प्रे मारल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान विभाग नियंत्रक देवरे यांच्यावर धुळे येथे असताना विनयभगांचाही गुन्हा दाखल असल्याचे सांगण्यात आले. संशयित महिलेला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता तिची जामीनावर सुटका करण्यात आली.

बसस्थानकात कर्मचार्‍यांतर्फे घटनेचा निषेध

घटनेप्रकरणी आगार प्रमुख निलिमा बागुल यांच्यासह बसस्थानकातील सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच कामगार संघटनांचे प्रतिनिधी यांनी विभाग नियंत्रण यांच्या कार्यालयासमोर निषेध व्यक्त केला. यानंतर सर्व कर्मचार्‍यांनी संबंधित संशयित महिला वाहक हिच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात स्थानिक गुन्हे शाखेचे बापू रोहम यांना निवेदन दिले.