पुणे । स्मगलिंगसाठी आणलेली 29 लाख रुपये किंमतीची जवळपास एक किलो वजनाची आठ सोन्याची बिस्किटे पुणे विमानतळावरून शनिवारी जप्त करण्यात आली. सीमा शुल्क विभागाने ही कारवाई केली.स्पाईस जेटच्या (एसजी 52) या दुबई ते पुणे या फ्लाईटची तपासणी करीत असताना सीमा शुल्क विभागाच्या अधिकार्यांना सीटच्या लाईफ जॅकेटमध्ये काळ्या सेलोटेपमध्ये गुंडाळून ठेवलेली ही 8 बिस्किटे आढळून आली़ त्यांचे वजन 933.11 ग्रॅम असून बाजारभावानुसार त्यांची किंमत 29 लाख 1 हजार 172 रुपये इतकी आहे.
तस्करीचा नवा फंडा
दुबई-पुणे हे आंतरराष्ट्रीय विमान असल्याने पुण्यात सर्व प्रवाशांची कस्टम तपासणी होते़ परंतु, पुण्यातून हे विमान डोमेस्टिक होऊन बंगळुरुला जात असल्याने तेथे कस्टम तपासणी होण्याची शक्यता नसते़ त्यामुळे तस्कर अशाप्रकारे वेगवेगळे मार्ग हाताळताना दिसत आहेत़ दुबईला एक जण सोने घेऊन विमानात येतो़ तो पुण्यापर्यंत येतो. सोने विमानातच लपवून ठेवतो़ पुण्यातून दुसरा साथीदार बंगळुरुला जातो़ उतरताना लपविलेले सोने घेऊन बाहेर निघून जातो, अशी युक्ती तस्कर अवलंबू लागले आहेत़ पण, सीमा शुल्क विभागाचे अधिकारी व कर्मचार्यांच्या सतर्कतेमुळे तस्करीचा प्रयत्न हाणून पडण्यात यश आले आहे.