मुंबई । क्वालालंपूरहून आलेल्या विमानातील एका प्रवाशाच्या बॅगेला पाहून मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील हवाई गुप्तचर विभागातील श्वानाने भुंकायला सुरुवात करून संशयित प्रवाशाची बॅग धरली. त्यानंतर अधिकार्यांनी बॅग तपासली असता त्यात 2 कोटी रुपयांचे मेथॅकिलोन हा अमली पदार्थ आढळून आला. याप्रकरणी सुरेश कुमार नागार्जुन या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी मध्यरात्री मलेशिया एअरलाईन्सचे विमान मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले होते. सर्व प्रवासी ग्रीन चॅनलमधून बाहेर पडत असतानाच हवाई गुप्तचर विभागाच्या उर्णी नावाच्या श्वानाने नागार्जुन या प्रवाशाच्या बॅगेकडे पाहत जोरजोरात भुंकण्यास सुरुवात केली. त्यानंतर उर्णीने ती संशयित बॅग आपल्या तोंडाने पकडली. उर्णीचा हा इशारा ओळखून हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकार्यांनी नागार्जुनला ताब्यात घेऊन त्याच्या बॅगेची तपासणी केली असता ड्रग्जचे किट आढळले.