पुणे । अबु धाबीवरून पुण्यामध्ये शिलाई मशीन आणि इस्त्रीद्वारे सोन्याची तस्करी करणार्या एकाला सोन्यासह अटक करण्यात आली आहे. पुणे विमानतळावर करण्यात आलेल्या या कारवाईत 97 लाख रुपये किंमतीचे 4 किलोपेक्षा अधिक वजनाचे सोने जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई पुणे विमानतळावर बुधवारी (20 डिसेंबर) 4.25 वाजता करण्यात आली. सैफुला नासर दुडगावे (रा. कोल्हापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
जेट एअरवेजच्या अबु धाबी विमानातून पुणे विमानतळावर उतरलेल्या इसमाचा संशय आल्याने त्याची झडती घेण्यात आली. त्याच्याकडे असलेल्या प्रवासी बॅगेत शिलाई मशीन आणि इस्त्रीच्या आतील बाजूस सोने लपवून ठेवलेले तपास पथकाला आढळून आले. एकूण 4 किलो 371 ग्रॅम असलेल्या या सोन्याची किंमत 97 लाख 7 हजार 818 रुपये इतकी आहे. सैफुला दुडगावे याला कस्टम विभागाच्या अधिकार्यांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.