पुणे : पुरंदर तालुक्यात होणार्या विमानतळाला विरोध करण्यासाठी सोमवारी विमानतळ विरोधी संघर्ष कृती समितीने सासवडमध्ये तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चाला ग्रामीण भागातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला त्यातही मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती. प्रस्तावित विमानतळास विरोध दर्शविण्यासाठी पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, एखतपूर-मुंजवडी, खानवडी, पारगाव येथील शेतकर्यांनी नुकत्याच ग्रामसभा घेतल्या. त्यात शासनाचा जोरदार निषेध करण्यात आला. तसेच, त्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी सौरभ राव याना देण्यात आले. शेतकर्यांचा विरोध पत्करून विमानतळ करणार नाही, अशी ग्वाही जिल्हाधिकार्यांनी तेव्हा दिली होती. सध्या शासनाचे निर्णय पाहता विमानतळ होण्याच्या हालचाली दिसू लागल्याने गावकरी पुन्हा हवालदिल झाले आहेत. नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या उपस्थितीत बैठक होऊन त्यात पॅकेज जाहीर होण्याबरोबरच उपजिल्हाधिकारी दर्जाच्या सात अधिकार्यांची भूसंपादनासाठी नेमणूक करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर हा मोर्चा काढण्यात आला होता.
आंदोलकांचा ठाम निर्धार
काहीही झाले तरी विमानतळ होऊच द्यायचा नाही, असा ठाम निर्धार या मोर्चातील महिला व ग्रामस्थांनी व्यक्त केला. तहसीलदार सचिन गिरी यांनी याबाबतचे निवेदन स्वीकारले. अतिरिक्त पोलिस आयुक्त तानाजी चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयाच्या परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता. मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
शिवतारेंनी समर्थन करू नये
जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे नेहमी विमानतळ विरोधी संघर्ष कृती समितीच्या सदस्यांवर दलाल असल्याची टीका करतात. परंतु, मोठे दलाल असून, त्यांना सामान्य शेतकर्यांचे काहीही देणे-घेणे नाही. आजवर त्यांनी तालुक्यात हजारो एकर जमीन घेतली आहे. त्या जमिनीवर विमानतळ करावा. आजपर्यंत शासनाचे अनेक प्रकल्प झाले. त्याचे पूर्णपणे पुनर्वसन झाले नाही. त्यामुळे शिवतारे यांनी विमानतळाचे समर्थन करू नये, अशी जोरदार टीका कृती समितीचे अध्यक्ष दत्ता झुरंगे यांनी केली.
गुंजवणीचे पाणी आणा
आमचे आंदोलन निर्णायक पातळीवर असून, शिवतारे यांनी गुंजवणीचे पाणी आणण्यावर लक्ष केंद्रीत करावे. त्यामुळेच इथला बळीराजा सुखी होईल. विमानतळाने तो विस्थापित होईल.
– दत्ता झुरंगे, अध्यक्ष विमानतळ विरोधी संघर्ष कृती समिती