विमानतळ चाकणलाच उभारण्याची मागणी

0

पिंपरी : पुरंदरऐवजी आंतरराष्ट्रीय विमानतळ चाकणलाच करावे, अशी मागणी पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना करण्यात आली आहे. यामुळे पुन्हा एकदा विमानतळ चाकण ते पुरंदर या क्षेत्रात चर्चेचा विषय होऊ लागले आहे.

पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे संरक्षण विभागाच्या विमान उड्डाणांना अडथळा येऊ शकतो का? याची चाचपणी केली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर पुरंदरऐवजी चाकण येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ करावे, अशी मागणी पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

चाकण, खेड या टप्प्यात काही ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्याचे शासनाचे जवळपास निश्‍चित झाले होते. मात्र, शेतकर्‍यांचा विरोध आणि अन्य कारणांमुळे हे विमानतळ पुरंदर येथे केले जाणार आहे. याठिकाणी जागेची एअरपोर्ट अथोरिटी ऑफ इंडियाच्या समितीने पाहणी केली आहे. अशातच आता नव्याने संरक्षण खात्याच्या विमानांच्या उड्डाणांना या प्रस्तावित विमानतळाचा काही अडथळा निर्माण होत असल्याची चाचपणी केली जात आहे.

20 ते 25 हजार उद्योग
वास्तविक पाहता, पिंपरी-चिंचवड, चाकण, तळेगाव, रांजणगाव या औद्योगिक वसाहतीमध्ये एकूण 20 ते 25 हजार लहान-मोठे उद्योग कार्यरत असून अजूनही नवीन कंपन्या येत आहेत. यामधे अनेक नामांकित आंतरराष्ट्रीय उद्योग समूहांच्या उत्पादन प्रकल्पांचा समावेश आहे. या सर्व घडामोडींमुळे चाकणचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचले आहे. या पार्श्‍वभूमीवर आंतरराष्ट्रीय विमानतळ औद्योगिक वसाहतीजवळ असणे आवश्यक आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांशी सामंजस्य करार करताना चाकण परिसरात आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याचे आश्‍वासन राज्य सरकारने दिले होते. मात्र, पुरंदरच्या प्रस्तावित विमानतळाचा या औद्योगिक वसाहतींना फायदा होणार नसल्यामुळे उद्योजकांमध्ये नाराजी पसरली आहे.

परिस्थिती अनुकूल
गेली पंधरा वर्षे चाकण विमानतळाची चर्चा सुरू होती. विमानतळासाठी जागांचे सर्वेक्षणदेखील झाले होते. मात्र, परंतु शेतकर्‍यांचा विरोध पाहून, विमानतळासाठी अधिकार्‍यांनी पुरंदर येथील जागेची पाहणी केली.

के.डी.एल कंपनी बरखास्त करून पुरंदरच्या धर्तीवर शेतकर्‍यांना नुकसान भरपाई दिल्यास हा विरोध असणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. चाकण येथील विमानतळामुळे बहुराष्ट्रीय कंपन्याच्या परदेशातून आयात होणार्‍या मशीन, कच्चा माल, स्पेअर पार्ट्स तसेच उत्पादित माल, वाहने यांची आयात-निर्यात करणे सुलभ होणार आहे. यासाठी चाकण येथेच विमानतळ होणे गरजेचे आहे. यासाठी चाकण येथेच विमानतळ उभारावा अशी मागणी पिंपरी-चिंचवड लघु-उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे व सचिव जयंत कड यांनी केली आहे.