पिंपरी-चिंचवड : पीएमपीएमएलतर्फे विमानतळ ते हिंजवडी-माण (फेज 3) या मार्गावर वातानुकूलित बससेवा सुरू करण्यात आली आहे. या वातानुकूलित बससेवेचा लाभ घेण्यासाठी पीएमपीएमएलकडून ऑनलाईन बुकिंगचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दरम्यान, या सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक प्रवाशाला 180 रुपये मोजावे लागणार आहेत.
सुरक्षित आणि विश्वासार्ह सेवा
हिंजवडी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आयटी इंडस्ट्री आहे. येथे काम करणारे अधिकारी व कर्मचारी नेहमीच विमान प्रवास करत असतात. त्यामुळे विमानतळ ते हिंजवडी या प्रवासासाठी त्यांना खासगी वाहन किंवा कुल कॅबचा आसरा घ्यावा लागत असे. या अधिकारी व कर्मचार्यांना सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवासी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पीएमपीएमएलने विमानतळ ते हिंजवडी-माण (फेज 3) या मार्गावर वातानुकूलित बससेवा सुरू केली आहे. ही सेवा सुरू करण्याची मागणी आयटीयन्सकडून होत होती.
असा आहे बसचा टायमिंग
विमानतळ, विमाननगर, पुणे स्टेशन, शिवाजीनगर, औंध गाव, वाकड, हिंडवडी गाव, फेज 1, फेज 2 आणि फेज 3 असा या वातानुकूलित बसचा मार्ग राहणार आहे. हिंजवडी माण फेज 3 येथून विमानतळ येथे जाण्यासाठी पहाटे 5.15, 5.45, 9, 9.45, दुपारी 1.15, 2.15 तर, सायंकाळी 5.30 आणि 6.30 वाजता गाडी सुटणार आहे. तसेच विमानतळ येथून हिंजवडी माण (फेज 3) येथे येण्यासाठी सकाळी 7.15, 7.45, 11.5, दुपारी 12, 3.15, 4.15 तर, रात्री 8.00 आणि 9.00 वाजता गाडी सुटणार आहे.