जळगाव। औरंगाबाद रस्त्यावरील विमानतळाच्या परिसरात गवताला आग लागली होती. ही आग पसरत जावून विमानतळात पोहचली परंतु वेळीच ती नियंत्रणात आणण्यात यश आले. 9 मे रोजी रात्री 9.30 ते 10 वाजेच्या सुमारास जळगाव विमानतळाच्या संरक्षक भिंतीच्या बाहेरील परिसरातील गवताला ही आग लागली होती.मंगळवारी रात्री आग लागल्यानंतर हवेचा जोर असल्याने ही आग पसरत जावून विमानतळातील धावपट्टीच्या बाजुला असलेल्या गवताला आगीचा स्पर्श झाला.
पोलिसात अकस्मात आगीची नोंद
हवेचा वेग जास्त असल्याने 10 मिनीटांमध्ये सुमारे 1 कि.मी.क्षेत्रातील गवत पेटले.जळगाव महानगर पालिकेचा अग्नीशमन बंब व जैन इरिगेशन कंपनीचा बंब घटनास्थळी पोहचला. मनपाच्या अग्नीशमन बंबाने विमानतळाच्या परिसरातील लागलेल्या आगीवर पाण्याचा मार करत आग आटोक्यात आणली. यानंतर आग पसरू नये यासाठी कोरडया गवतावर पाण्याचा मारा केला. परिसरात कमरे पर्यंत गवत वाढलेले होते. गेल्या 5 दिवसांपासून जळगाव शहराचे तापमान 45 अंश सेल्सीअस आहे. आग शमविण्यासाठी सागर बागुल, योगेश पवार, भरत धनगर आदींनी परिश्रम घेतले.