विमानतळ भूसंपादनाच्या पॅकेजसाठी आज मुंबईत बैठक

0

पुणे : पुरंदरमधील प्रस्तावित विमानतळाच्या भूसंपादनापोटी शेतकर्‍यांना द्यावयाच्या मोबदल्याचे पॅकेज ठरविण्यासाठी शनिवारी मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीकडे पुरंदर तालुक्यातील शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे.

आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी राज्य सरकारने पुरंदर तालुक्यातील जागा निश्चित केली आहे. या जागेचे सर्व्हेक्षण विमानतळ प्राधिकरणाने केले आहे. प्राधिकरणाने त्याचा अहवाल एअरपोर्ट ऍथॉरिटी ऑफ इंडियाकडे पाठविण्यात आला होता. त्यास एअरपोर्ट ऍथॉरिटीने मान्यता दिली आहे. े हे सर्व्हेक्षण करताना पुरंदर तालुक्यातील ज्या परिसरात नियोजित विमानतळ होणार आहे, त्या परिसरातील गावठाण या भूसंपादनातून वगळण्यात आले आहे.

एकीकडे विमानतळ प्राधिकरणाकडून सर्व्हेक्षणाचे काम सुरू असतानाच दुसरीकडे नियोजित विमानतळासाठी सर्वंकष विकास आराखडा’ (डीपीआर) तयार करण्यासाठी प्राधिकरणाकडून आंतरराष्ट्रीय स्तरावरून निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यात जर्मनीतील डॉर्स कंपनीची निवड प्राधिकरणाने करण्यात आली आहे. या कंपनीला हे काम देण्यात आले असून, त्यासाठी 9 कोटी 41 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. सहा महिन्यांत या कंपनीने अहवाल तयार करून सादर करणे आवश्यक आहे.

भूसंपादनासाठीचे पॅकेज जिल्हा प्रशासनाकडून तयार करण्यात आले. त्यास केवळ मान्यता मिळणे गरजेचे आहे. परंतु, मध्यंतरी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये हे पॅकेज जाहीर करण्यात आले नाही. निवडणुका संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन शेतकर्‍यांना द्यावयाचे पॅकेज अंतिम करण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले होते. निवडणुका संपल्या. त्यांनतर विधानसभा अधिवेशनानंतर ही बैठक होईल, असे सांगण्यात आले. मात्र, अधिवेशन सपंल्यानंतरही मुख्यमंत्र्यांना वेळ मिळाला नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना द्यावयाचे पॅकेज अंतिम होऊ शकत नव्हते. आता या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी येत्या शनिवारी ही बैठक बोलविली आहे.