पुणे । लोहगाव विमानतळ विस्तारीकरणाचे काम हवाई दलाच्या आडमुडेपणामुळेच रखडले आहे. लोहगाव विमानतळ विस्तारीकरणाचा आराखडा तयार होऊन देखील काम सुरू झालेले नाही. आता याविषयीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून राज्य शासनाला सादर केला आहे. त्यामुळे लोहगाव विमानतळ विस्तारीकरणावर राज्य शासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विमान प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन लोहगाव विमानतळाचे विस्तारीकरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मागील काही महिन्यांपूर्वी पुण्यात बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी लगतची 15 एकर जागा ताब्यात देण्यास हवाई दलाने तत्वत: मान्यता दिली होती. तसेच विमानतळाच्या 900 मीटरच्या परिसरातील नो डेव्हलपमेंटमधील खासगी मालकांची जागा ही ताब्यात घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. एअरपोर्ट अॅथॉरिटीकडून विमानतळ विस्तारीकरणाच्या आराखड्याला मान्यताही मिळाली होती. मात्र विस्तारीकरणासाठी आवश्यक असलेली जागा अद्याप ताब्यात येऊ न शकल्याने हे काम थांबले असल्याचे समोर आले आहे.
15 एकर जागा द्या
15 एकर जागेच्या मोबदल्यात विमानतळाच्या 900 मीटरच्या परिसरात येणार्या जागेपैकी 15 एकर जागा मिळावी, असा आग्रह हवाई दलाने घेतला आहे. वास्तविक लोहगाव परिसरात हवाई दलाची जवळपास 2 हजार 200 एकर जागा आहे. त्यापैकी 90 टक्क्यांहून अधिक जागा तशीच पडून आहे. तसेच हवाई दलाची जागा सरकारच्या दुसर्या म्हणजे एअरपोर्ट अॅथॉरिटीकडेच वर्ग होणार आहे. त्यामुळे हवाई दलाने आग्रह धरू नये.
जागेसाठी 100 कोटी मोजा
विमानतळाच्या परिसरातील जागा हवाई दलास हवी असल्यास त्या जागेच्या मोबदल्यापोटी शंभर कोटी रुपयांहून अधिक निधी लागणार आहे. त्यामुळे या जागेऐवजी लोहगाव परिसरापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या भावडी गावातील 15 एकर जागा देण्याचा पर्याय जिल्हा प्रशासनाकडून ठेवण्यात आला आहे. यासाठी मात्र हवाई दल तयार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, हवाई दलास जागेच्या मोबदल्यात जागा देण्यासंदर्भातील पर्यायांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्यास मान्यता मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले.