‘जनशक्ति’ला दिलेल्या सदिच्छा भेटीप्रसंगी शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची माहिती
पिंपरी-चिंचवड : खेड-चाकण येथे होणारे विमानतळ पुरंदरला स्थलांतरीत झाले आहे. भौगोलिक व तांत्रिक परिस्थितीची चाचपणी केल्यानंतरच त्याआधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, विरोधकांनी याच मुद्द्यावरून माझी बदनामी करत अपप्रचार केला. या विषयावरून भोसरीकरांनी माझी सर्वात जास्त बदनामी केली. मला घाबरून मुख्यमंत्र्यांनी चाकणला होणारे विमानतळ पुरंदरला हलवावे किंवा मी विरोध करावा आणि विमानतळ दुसरीकडे स्थलांतरीत होईल, एवढा मी मोठा नाही. मी एकटा विमानतळ स्थलांतरीत करू शकेल, एवढी ताकद माझ्यात नाही, अशी माहिती शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली. गुरुवारी दुपारी त्यांनी दैनिक ’जनशक्ति’च्या आकुर्डीतील मुख्य कार्यालयास सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी ते बोलत होते. आतापर्यंतची राजकीय वाटचाल, आलेले अनुभव, केलेली व प्रस्तावित कामे, राजकीय जीवनातील चढ-उतार, अशा अनेक विषयांवर त्यांनी ‘जनशक्ति’च्या संपादकीय सहकार्यांशी दिलखुलास चर्चा केली.
विमानतळासाठी सहा जागांचे सर्वेक्षण
विमानतळासाठी पुणे जिल्ह्यातील सहा जागांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात चाकण येथील जागेचाही समावेश होता. चाकणला विमानतळ होणारच असे अपेक्षित असताना अचानक हे विमानतळ पुरंदरला स्थलांतरीत झाल्याचे समोर आले. चाकण येथून विमानतळ स्थलांतरीत करण्यामागचे कारण काय? यासंदर्भात मी राज्य शासनासह भारतीय विमान पत्तन प्राधिकरणाकडून माहिती मागविली होती. त्यात, भौगोलिक व तांत्रिक बाबी लक्षात घेता हा निर्णय झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र, यासंदर्भात विरोधकांनी माझी खूप बदनामी केली. परंतु, खरी परिस्थिती वेगळी आहे, असे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले.
पाच हजार एकर सलग जागा हवी
विमानतळासाठी भारतीय विमान पत्तन प्राधिकरणाला सुमारे पाच हजार एकर सलग जागा हवी होती. चाकणला तशी सलग जागा नव्हती. चाकणच्या जमिनीचे सर्वेक्षण केल्यानंतर तसा अहवाल प्राधिकरणाने दिला होता. माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना 2013 मध्ये तो अहवाल देण्यात आला होता. परंतु, त्यांनी तो अहवाल दडपून ठेवला. त्यानंतर 2014 मध्ये पुन्हा विमानतळाच्या जागेसाठी सर्वेक्षण झाले. तेव्हा भारतीय विमान पत्तन प्राधिकरणाने चाकणला ‘सिंगल रन वे’चे विमानतळ होऊ शकेल, असा अहवाल दिला होता. परंतु याच पद्धतीचे विमानतळ पुण्यात आधीच आहे. परत असेच विमानतळ पुण्याजवळ तयार करण्यात अर्थ नाही, असेही प्राधिकरणाने या अहवालात म्हटले होते. यावरून विमान पत्तन प्राधिकरणाचा चाकण विमानतळाला रेड सिग्नल असल्याचे स्पष्ट होते. मात्र, विरोधकांनी राजकीय स्वार्थासाठी माझ्या विषयी अपप्रचार केला, असे खासदार आढळराव पाटील यांनी सांगितले.
भौगोलिक परिस्थिती बदलणे अशक्य
चाकण येथे विमानतळ उभारायचे असल्यास भौगोलिक परिस्थिती बदलावी लागेल. येथील नदीचा प्रवाह बदलून तसेच दोन मोठे डोंगर फोडून मोकळी जागा निर्माण करावी लागेल, असेही विमान पत्तन प्राधिकरणाने आपल्या सर्वेक्षण अहवालात म्हटले होते. मात्र, भौगोलिक परिस्थिती बदलणे शक्य नसल्यानेच चाकणचे प्रस्तावित विमानतळ पुरंदरला स्थलांतरीत झाले आहे, असे त्यांनी सांगितले.
नोटाबंदी फसली!
केंद्र सरकारने केलेली नोटाबंदी पूर्णपणे फसली आहे. नोटाबंदीचे फार वाईट परिणाम झाले आहेत. आपला जीडीपी दोन टक्क्यांनी घसरला आहे. उद्योग-धंदे यांचे पार कंबरडे मोडले आहे, असेही खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, केंद्रात सत्तेत येऊन भाजप सरकारला तीन वर्षांचा कालावधी झाला आहे. मात्र, आतापर्यंत सरकारने एकही मोठा प्रकल्प पूर्ण केल्याचे दिसत नाही. जुन्या काळातील प्रकल्पांचीच उद्घाटने सुरू आहेत. नोटाबंदी केल्यामुळे अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे. लाखो लोकांच्या नोकर्या गेल्या, उद्योजक मंडळीचे नियोजन कोलमडले आहे, असेही ते म्हणाले.
निवडणुका जिंकणे, हाच सरकारचा अजेंडा
केंद्र सरकारचे मार्केटींग व प्रेझेंटेशन जोरात सुरू आहे. निवडणुका जिंकणे, हाच त्यांचा एकमेव अजेंडा आहे. सर्वसामान्य लोकांचे प्रश्न-समस्या सुटो अथवा न सुटो; देशाचा विकास होवो अथवा न होवो, याच्याशी सरकारला काहीही देणे घेणे नाही, अशा शब्दात खासदार आढळराव पाटील यांनी भाजप सरकारवर टीका केली.