चाकण : गेल्या वीस वर्षांपासून खेड तालुक्याच्या मानगुटीवर बसलेल्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ कोये-पाईट-धामणे येथून हद्दपार करण्यात आल्याने शेतकर्यांच्या संघर्षाला यश आले आहे. त्यामुळे खेडच्या पश्चिमपट्ट्यातील शेतकर्यांनी मिठाई वाटून आणि फटाके फोडून जल्लोष केला. तर चाकण औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय प्रस्तावित विमानतळ गेली वीस वर्षे खेड तालुक्यातील वेगवेगळ्या जागेवर होणार असे सुचविले जायचे, मात्र येथील शेतकर्यांनी, राजकीय पक्षांच्या पदाधिकारी, नेते यांनी मोठमोठी आंदोलने करत कायमच विमानतळाला प्रखर विरोध केला होता. त्यामुळे प्रत्येक वेळी नवीन जागांची घोषणा करण्यात येत होती. लांडगा आला रे आला या म्हणीप्रमाणे खेड तालुक्यातील विमानतळाच्या जागेचा घोळ चालू होता.
विमानतळ पुरंदर तालुक्यात होणार..
या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ राजगुरूनगर येथील सेझमध्ये होणार असल्याचे सोशल मीडियाद्वारे सांगितल्याप्रमाणे या महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच एअरपोर्ट अॅथोरिटीचे पथक आले व त्यांनी सेझच्या जागेची पाहणी न करता संबंधित पथकाने पाईट, कोये, धामणे, तळवडे आदी गावातील जमिनींची पाहणी केली. खेड तालुक्यातील या जागांची पाहणी केल्यानंतर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी ही जागा अपुरी असल्याचे मत पथकाने मांडले. आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी किमान अठराशे हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. एवढी जमीन असेल तरच विमानतळासमवेत कार्गो हब, पंचतारांकित हॉटेल अशा सुविधा देता येऊ शकतात. खेड तालुक्यातील सुरुवातीच्या प्रस्तावित जागा बाराशे हेक्टरच्या आहेत. त्या किमान अठराशे हेक्टर कराव्या लागतील. या सुविधांशिवाय नुसता विमानतळ होऊ शकत नाही, असे पथकाने स्पष्ट केले आहे. त्यानंतर या पथकाने पुरंदर तालुक्यातील जागेची पाहणी करून पसंती दाखविण्यात आली. तसा अहवाल मुख्यमंत्र्यांना देण्यात आल्यावर त्यांनी विमानतळ पुरंदर तालुक्यात होणार असल्याची घोषणा केली.
पत्रकार बांधवांचे केले कौतुक
कोये-पाईट-धामणे येथे विमानतळ होणार नसल्याचे घोषित झाल्यामुळे शेतकर्यांनी धामणे फाटा या ठिकाणी येऊन एकमेकांना मिठाई वाटली व फटाके फोडून आनंद व्यक्त केला. गेले कित्येक वर्षे विमनतळाचे भूत कोये-पाईट-धामणे येथील शेतकर्यांच्या मानगुटीवर बसले होते. परंतु, या परिस्थितीला न डगमगता परिस्थितीवर मात करत शेतकर्यांनी अखेरपर्यंत लढा देवून यश संपादन केले. विमानतळ हे पुरंदर-राजेवाडी येथेच होणार असल्याने शेतकर्यांनी सुटकेचा निश्वा:स सोडला आहे. तसेच शेतकर्यांचा प्रखर विरोध आणि पत्रकारबांधवांची साथ यामुळेच हा प्रकल्प येथून गेल्याचे सिद्ध झल्याने या वेळी पत्रकार बांधवांचेदेखील मनभरून कौतुक करण्यात आले.
सरकारच्या निर्णयाने उद्योजकांमध्ये नाराजी
खेड तालुक्यातील विमानतळ पुरंदरला हलविण्यात आल्याने राज्य सरकारच्या निर्णयाबाबत उद्योजकांनी तीव्र नाराजी व्यक्तकेली. या संदर्भात जिल्ह्यातील काही लघुउद्योजकांनी मुख्यमंत्र्यांना लेखी निवेदन दिले आहे. चाकण, तळेगाव, रांजणगाव, पिंपरी, चिंचवड आदी औद्योगिक परिसरामध्ये एकूण बारा ते पंधरा हजार लहान-मोठ्या कंपन्या असून, नवीन कंपन्या अजूनही उभ्या राहत आहेत. यामध्ये अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा समावेश आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळ औद्योगिक वसाहतीजवळ होणे आवश्यक आहे. मात्र पुरंदरला होणार्या विमानतळाचा या औद्योगिक वसाहतींना काहीही फायदा होणार नसल्यामुळे उद्योजकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. गेल्या पंधरा वर्षापासून विमानतळ खेड, चाकणमध्ये होणार अशी चर्चा होती, परंतु येथील शेतकर्यांनी प्रचंड विरोध केल्याने पुरंदरच्या जागेची एअरपोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या पथकाने पाहणी केली. खेड तालुक्यातील औद्योगिक भागातील उद्योजक व परदेशी तंत्रज्ञ यांच्यासाठी विमानतळ होणे गरजेचे आहे.
राजकीय नेते म्हणतात विमानतळाला विरोध नाही
स्थानिक राजकीय पुढार्यांनी या भागातील विमानतळाचा विरोध केला होता, शेतकर्यांना एकत्र करून, विमानतळ हटवा, शेतकरी वाचवा, अशी घोषणा करत आम्ही शेतकर्यांच्या बाजूने असून येथील शेतकरी देशोधडीला लागला आहे. यापुढे खेड तालुक्यात उद्योग नकोत, त्यामुळे गेली पंधरा वर्षे विमानतळाचे घोंगडे भिजत राहिले, शेतकरी व स्थानिक राजकीय पुढार्यांचा प्रचंड विरोध होत असल्यानेच विमानतळ पुरंदरला गेल्याचे उद्योजक सांगत आहेत. मात्र विमानतळ पुरंदरला होणार अशी घोषणा झाल्यावर आम्ही नाही त्यातले प्रमाणे आमच्याकडून कधीही विमानतळाला विरोध झाला नसल्याचे अनेक राजकीय नेते जाहीर सांगत आहेत. खेड तालुक्यात विमानतळ होण्यासाठी स्थानिक राजकीय नेत्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची तयारीही केल्याचे समजते. एकंदरीतच विमानतळ कुठे होईल हे तूर्तास तरी कोणीही सांगू शकत नाही.