विमानातील ‘दंबगिरी’ला चाप!

0

नवी दिल्ली : विमान प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने पहिली ‘नो-फ्लाय लिस्ट’ जारी केली आहे. त्यानुसार विमानात गैरवर्तन करणार्‍यांवर कायदेशीर आणि प्रवासबंदीची कारवाई करण्यात येईल, असे केंद्रीय मंत्री अशोक गजपती राजू यांनी स्पष्ट केले. ही ‘नो-फ्लाय लिस्ट’ तीन प्रकारच्या वर्गवारीत विभागण्यात आली आहे. त्यानुसार विमानात गैरवर्तन करणार्‍यांवर आजीवन बंदीही घातली जाऊ शकते. विमानतळावर एखाद्या प्रवाशाने जिवे मारण्याच्या धमकीसह हंगामा केल्यास त्याच्या विमान प्रवासावर दोन वर्षांपर्यंत प्रतिबंध घालण्यात येणार आहे.

गैरवर्तन करणे भोवणार!
केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी सांगितले, की विमान प्रवाशांची सुरक्षितता हे या नो-फ्लाय लिस्ट जारी करण्यामागील कारण आहे. नो-फ्लाय लिस्ट तीन प्रकारच्या वर्गवारीत विभागली आहे. शाब्दिक बाचाबाची अथवा गैरवर्तन करणार्‍यांवर तीन महिन्यांसाठी या यादीत टाकले जाणार आहे. दुसरे म्हणजे, मारहाण करणार्‍यांना सहा महिन्यांसाठी या यादीत टाकण्यात आले आहे. तर जीवे मारण्याची धमकी अथवा गैरवर्तन करणार्‍यांना किमान दोन वर्षांसाठी तर कमाल आजीवन प्रवास बंदी घातली जाऊ शकते. या बंदीविरोधात अपील करण्यासाठी एक समिती असेल आणि त्यानंतर न्यायालयात त्याला आव्हान देता येऊ शकते. दरम्यान, या वर्षाच्या सुरुवातीलाच शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचार्‍याशी गैरवर्तन केल्याची घटना घडली होती. त्यानंतर देशातील बहुतांश विमान कंपन्यांनी त्यांच्यावर प्रवास बंदी घातली होती. काही दिवसांनी विमान कंपन्यांनी त्यांच्यावरील बंदी हटवली होती. या प्रकरणानंतर नो-फ्लाय लिस्ट जारी करण्याबाबत चर्चा झाली होती. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी नो-फ्लाय लिस्ट जारी करणारा भारत हा पहिलाच देश आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी सांगितले.