हैदराबाद – मुंबई, चेन्नई आणि हैद्राबाद या तीन ठिकाणांहून विमान अपहरण होणार असल्याचा खळबळजनक इमेल अज्ञात व्यक्तीने मुंबईच्या पोलीस आयुक्तांना पाठवला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला होता. राज्यभर अलर्ट घोषित करण्यात आला होता, मात्र ही माहिती होती, तो इमेल पाठवणार्या व्यक्तीला हैदराबाद पोलिसांच्या टास्क फोर्सने अटक केली.
अज्ञात महिलेच्या नावाने उपरोक्त इमेल पाठवण्यात आला होता. वामसी असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. पुण्यातील आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी त्याला जायचे होते. पण विमानाच्या तिकीटासाठी पैसे नसल्याने नैराश्यातून हे कृत्य त्याने केले, अशी कबुली त्याने पोलिसांकडे दिली आहे. मुंबई पोलिसांना मागच्या आठवड्यात शनिवारी रात्री वरील आशयाचा ई-मेल मिळाला होता. तो हैदराबादमधील एका महिलेच्या नावाने पाठवण्यात आला होता. त्यात सहा व्यक्तींचे संभाषण आपण ऐकले असून, एकूण 23 जण येथून वेगवेगळ्या विमानांत बसणार आहेत. मुंबई, चेन्नई आणि हैदराबाद या तीन शहरांतून ते विमानांचे अपहरण करणार आहेत, असा दावा ई-मेलमधून करण्यात आला होता. या ई-मेलमुळे खळबळ उडाली होती. पोलिसांनी विमानतळांवरील सुरक्षा व्यवस्था वाढवली होती. पोलिसांना सतर्क राहण्यासही सांगितले होते. विमान अपहरणाच्या कटाची अफवाही पसरवली जाऊ शकते, असा पोलिसांना अंदाज होता. पण चौकशी पूर्ण होईपर्यंत सुरक्षाविषयक काळजी घेणे आवश्यक आहे, असे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे महासंचालक ओ. पी. सिंग यांनी सांगितले होते.
ई-मेलमधील मजकूर मुंबई पोलिसांनी सुरक्षा व गुप्तचर संस्थांना त्याच रात्री पाठवला होता. त्यानंतर विमानतळाशी संबंधितांची बैठक घेण्यात आली होती. रविवारी सकाळपासूनच तीनही विमानतळांवर घातपातविरोधी मोहिमा राबवण्यात आल्या होत्या. प्रवासी, त्यांचे सामान अशा अनेक गोष्टींची बारीक तपासणी करण्यात येत होती. सीआयएसएफने स्निफर डॉग्जही सेवेत आणले होते आणि सॅनिटेशन ड्रिससाठी कमांडो पथके तैनात केली होती. दुसरीकडे तो ई-मेल पाठवणार्या व्यक्तीचा शोध पोलीस घेत होते. त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती मुंबई पोलिसांनी हैदराबाद पोलिसांना दिली होती. हैदराबादमधील अमीरपेट परिसरातून पोलिसांनी वामसी याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता आपणच अज्ञात महिलेच्या नावाने बोगस ई-मेल मुंबई पोलिसांना पाठवल्याचे सांगितले.