विमान प्रवास महागणार

0

मुंबई । कच्च्या तेलाच्या किंमतीत कमालीची वाढ झाल्याने आता भारतीयांकरिता देशांतर्गत हवाई प्रवासही आता महाग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विमानाकरिता लागणारे ऑईल हे पेट्रोल, डिझेलच्या तुलनेने महाग असते, त्यातच कच्च्या तेलाच्या किंमती वाढण्याबरोबरच आयातीत तूट आल्याने याचा फटका देशांतर्गत कमी पल्ल्यांच्या विमान प्रवासांना बसणार आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीनुसारच देशांतर्गत आणि देशाबाहेरील विमान प्रवासाचे शुल्क ठरवले जाते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपठेतील या घडामोडींमुळे आता सामान्य पर्यटकांचे विमान प्रवासाचे स्वप्न महाग झाले आहे.

कच्च्या तेलाच्या किंमती पुन्हा वाढल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी खळबळ माजली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याच कच्च्या तेलाच्या बाजारपेठेच्या आधारे निवडणुकांच्या आधी मोठ मोठी आश्‍वासने देत अच्छे दिनाची स्वप्ने दाखवली होती, ती हवेत विरली असून आता सामान्य माणसाला आवश्यक असणार्‍या प्रत्येक घटकांचे भाव गगनाला भिडत चालल्याचे स्पष्ट झाले आहे. विमान इंधनाच्या आतंरराष्ट्रीय बाजारातील किंमती वाढल्याने जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात विमान प्रवास महागले होते. नोव्हेंबर डिसेंबरच्या तुलनेत जानेवारीतील दरवाढ ही 8 टक्के अधिक होती, त्यातही आता जवळपास दुप्पट भाडेवाढ होणार आहे. इंधनाच्या वाढत्या किंमतीचा अधिभार हा वैमानिक कंपन्यांनी थेटपणे ग्राहकांच्या माथी मारला आहे.

प्रवास शुल्कात मोठी वाढ
एयरवेज या विमान कंपनीच्या एका उच्चाधिकार्‍यांनी याविषयी अधिक माहिती देताना सांगितले आहे की, डोमेस्टीक फ्लाईटच्या ग्राहकांच्या तिकीटातच कराचे प्रमाण वाढणार असून, आता 100 ते 300 रूपयांचे तिकिट 700 ते 1 हजार रूपये इतकी वाढ होणार आहे.

देशांतर्गत विमान प्रवास करणार्‍यांची संख्या 10 कोटींहून अधिक
स्वस्त विमान इंधन, खासगी विमान कंपन्यांमधील ग्राहक खेचण्याची स्पर्धा, नेटवर्क, ऑनलाईन तिकीटांची सुविधा, देशांतर्गत विमानतळ, हेलिपॅडची वाढती संख्या आणि हवाई मार्गांची उपलब्धतता आदी कारणाने गत दोन वर्षात विमान प्रवास करणार्‍यांची संख्या 10 कोटींपेक्षाही अधिक झाली होती. यात देशांतर्गत पर्यटन करणार्‍यांची संख्या एका वर्षातच 9 कोटी इतकी होती. सध्या किंगफिशर, स्पाईसजेट, इंडिगो, एयर इंडिया, एयरवेज आदी महत्वाच्या कंपन्या विमान प्रवासी सेवा देत आहेत. यातही इंडिगो या विमान कंपनीची 39.3 इतकी भागीदारी, तर जेट एयरवेजची 16.3, आणि स्पाईस जेटची 12.7 टक्के इतकी भागीदारी राहिली आहे.

कसा उडणार आम आदमी?
पंतप्रधान मोदी यांनी गतवर्षी उडे देश का आम आदमी या नावाने एक विमान प्रवास योजना जाहिर केली होती. मात्र तांत्रिक अडचणींमुळे आता ही योजना येत्या एप्रिलपर्यंतही पूर्णत्वास येणे शक्य नाही. याबाबतची असमर्थतता नुकतीच भारतीय विमान प्राधिकरणाचे अध्यक्ष गुरूप्रसाद मोहोपात्रा यांनी एका पत्रकार परिषदेत व्यक्त केली होती.