विराटच्या जाहिरातीवर आक्षेप; अटकेच्या मागणीसाठी कोर्टात याचिका

0

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची एका जाहिरातीमुळे अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. विराटकडून दिशाभूल करणारी जाहिरात केली गेली असून त्याला अटक करण्यात यावे या मागणीसाठी मद्रास उच्च न्यायलयात एका वकिलाने याचिका दाखल केली आहे. विराटने ऑनलाईन जुगाराच्या अॅपची जाहिरात केली. या जाहिरातीमध्ये कोहलीने लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. या अॅपमध्ये जुगार खेळण्यासाठी एका मुलाने उसणे पैसे घेतले होते. या पैशांची परतफेड करता न आल्यामुळे त्या मुलाने आत्महत्या केली, ही गोष्टही या याचिकेमध्ये दाखल करण्यात आली आहे. कोहलीच्या या जाहिरातीमुळे अनेकांना जुगारीचे व्यसन लागल्याचे आरोप करण्यात आले आहे.

सध्या कोरोनामुळे विराट पत्नी अनुष्का शर्माबरोबर घरीच राहत आहे. त्यामुळे विराट घराबाहेर पडला नसतानाही त्याच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. कोहली हा जनतेची दिशाभूल करत असून त्यामुळे बऱ्याच लोकांना व्यसन लागले आहे, असे या याचिकेच म्हटले गेले आहे.

ऑनलाईन जुगारामध्ये आतापर्यंत बरेच युवक दिवाळखोर झालेले पाहायला मिळालेले आहे. युवकांना या ऑनलाईन जुगाराचे व्यसन लागलेले आहे. हे ऑनलाईन जुगाराचे व्यसन सोडवायचे असेल तर त्यावर बंदी आणणे हा सर्वात चांगला पर्याय असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता मंगळवारी उच्च न्यायालय काय निकाल देते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.